

बारामती: अजितदादानंतर बारामतीची निवडणूक आज पार पडत आहे. अजितदादांच्या कार्याला श्रद्धांजली म्हणून बारामतीकर मोठे संख्येने घराबाहेर पडत सुनेत्रा काकींना विजयी करतील.
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा आता काही विषय उरलेला नाही. त्यामुळे २०२९ ला बारामतीत कदाचित पवार विरुद्ध पवार अशी ही लढत होऊ शकते, असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.
बारामती तालुक्यातील पिंपळी येथे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. आमदार पवार म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले असते तर २०२९ ला अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते.
विलीनीकरणाचा विषय त्यांच्या हयातीत सुरू होता. आता त्यांच्या पश्चात विलीनीकरणाचा विषय राहिलेला नाही. बारामतीकरांनी यापूर्वी लोकसभेला व विधानसभेला पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहिली आहे.
२०२९ ला विधानसभेला पवार विरुद्ध पवार अशी लढत होऊ शकेल. अर्थात पवार विरुद्ध पवार अशी लढत बारामतीकरांना आवडत नाहीत. पण राजकारणात त्या-त्या वेळच्या प्राप्त परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो.
सुनेत्राकाकी २०२९ ची निवडणूक लढवणार की नाही हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. त्या लढवणार नसतील तर जय पवार यांना उभे करण्याचा निर्णय त्यांचा पक्ष घेऊ शकतो. तो त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे. अर्थात त्यावेळी पवार विरुद्ध पवार अशी ही लढत होऊ शकते, असे आमदार पवार म्हणाले.