

पुणे: सर्व जगभर वसुंधरा दिन साजरा होत असतानाच चक्क महापौरांच्या बंगल्यातच तब्बल 19 वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांची कत्तल करण्यात आली असल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे, महापालिकेच्या वृक्ष संवर्धन विभागानेच या वृक्षांच्या छाटणीचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला होता. त्यासाठी महापौर बंगल्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी या वृक्षांच्या फांद्या तोडण्याचे कारण देण्यात आले आहे.
महापालिकेच्या वृक्ष संवर्धन विभागाचे हॉर्टिकल्चर मिस्त्री रवींद्र कांबळे यांनी दि. 12 मार्चला घोले रस्त्यावरील महापौर बंगल्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या 19 वृक्षांच्या फांद्या छाटणीचा प्रस्ताव शिवाजीनगर- घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्तांकडे मंजुरीसाठी ठेवला होता.
त्यावर सहायक आयुक्तांनी लगेचच तत्परता दाखवून दि.13 मार्चला हा प्रस्ताव मंजूर करून त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वृक्ष संवर्धन विभागाने दोन दिवसांपूर्वी फांद्या छाटणीच्या नावाखाली 19 वृक्षांची अक्षरशः कत्तल करण्याचे काम केले आहे.
यासंदर्भात वृक्षप्रेमी समीर निकम यांनी आयुक्त नवल किशोर राम यांना दिलेल्या निवेदनात जागतिक वसुंधरा दिनाच्या दिवशीच शहराच्या प्रथम नागरिकांच्या बंगल्यातील वृक्षतोडीचे प्रकरण समोर आले आहे.
यातून पर्यावरण निगडीत खात्यामधील अधिकारी किती जागरूक आहेत हे समोर आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केला असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. ज्यांच्यावर वृक्ष संवर्धनाची जबाबदारी आहे, त्याच हॉर्टिकल्चर मिस्त्रीने स्वत:च वृक्ष छाटणीसाठी अर्ज केला व तो स्वत:च मंजूर केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रुपेश केसेकर यांनी केला आहे.
महापौर बंगल्याच्या आवारातील अनेक वृक्ष खराब झाली होती. त्यांच्या फाद्यांही कुजक्या झाल्या होत्या, त्यातून किडेही बाहेर पडत होते. त्यामुळे संबंधित वृक्षांच्या फाद्यांची छाटणी करून त्यावर औंषध फवारणी करण्यात आली आहे. या वृक्षांना पुन्हा फांद्या फुटतील. तसेच, नियमाप्रमाणे परवानगी घेऊनच ही प्रक्रिया करण्यात आली असून, केवळ त्यांच्या फांद्या तोडल्या असून, त्यांची कत्तल केलेली नाही.
- मंजूषा नागपुरे, महापौर.