भामा आसखेड: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) टप्पा क्रमांक दोन परिसरात रस्त्याच्या कडेला साचलेल्या कचर्याच्या ढिगांमुळे स्थानिक नागरिक आणि ग्रामपंचायत प्रशासन त्रस्त झाले आहे. कचर्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. वाढत्या नागरीकरणामुळे एमआयडीसी क्षेत्रात कचर्याची समस्या अधिक गंभीर बनत चालली असताना ती सोडविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
एमआयडीसी टप्पा दोनच्या हद्दीतील भांबोली, वासुली, शिंदे, वराळे, सावरदरी, खालुंबरे या सहा गावांमध्ये गेल्या काही वर्षांत नागरीकरण वाढले आहे. औद्योगिक वसाहतींमुळे रोजगाराच्या संधी वाढल्याने नागरीकरण वाढले. (Latest Pune News)
यामुळे घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक कचर्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. रस्त्याच्या कडेला आणि मोकळ्या जागांवर साचलेल्या कचर्याच्या ढिगांमुळे दुर्गंधी सुटल्याने रोगराईचा धोका आहे. एमआयडीसी प्रशासन याबाबत काहीही उपाययोजना करत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
या भागातील ग्रामपंचायत प्रशासन कचर्याच्या समस्येने त्रस्त आहे. रस्त्याच्या कडेला नागरिक व व्यावसायिकांकडून कचरा टाकला जात असल्याने ग्रामपंचायतीस स्वच्छता राखणे कठीण झाले आहे. ग्रामपंचायतींना कचरा उचलण्यासाठी पुरेशा घंटागाड्या आणि मनुष्यबळाची कमतरताही आहे.
एमआयडीसीकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने कचर्याचे व्यवस्थापन, नियमित स्वच्छता मोहीम राखणे ग्रामपंचायतीला शक्य होत नाही. कचर्याच्या समस्येवर कचरा डेपो होणे हीच गरज आहे. एमआयडीसी प्रशासनाने कचरा डेपो उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली, तर कचर्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे ग्रामपंचायत प्रशासनाला सोपे होणार आहे. एमआयडीसी प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.