

भामा आसखेड: राजगुरुनगर व राक्षेवाडी परिसरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 10 ते 12 भटक्या कुर्त्यांची झुंड सार्वजनिक ठिकाणी, सोसायट्यांत, तसेच मुख्य रस्त्यांवर उघडपणे फिरत असल्याने नागरिक, विशेषतः महिला व लहान मुले दहशतीखाली आहेत.
राक्षेवाडी येथील प्रसन्न रेसिडेन्सी, अमरप्रभू, साईविश्व आदी सोसायट्यांत ही कुत्री नियमितपणे फिरताना दिसतात. त्यांच्या भक्कम शरीरयष्टीमुळे त्यांच्यासमोरून जाण्याची अनेकांची हिम्मत होत नाही. त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास ते गुरगुरतात, अशा प्रकारच्या घटनांनी भीती वाढली आहे. (Latest Pune News)
विशेषतः चिकन सेंटर, ढाबा, मटण हॉटेल्स परिसरात टाकल्या जाणार्या टाकाऊ पदार्थ व अन्नावर ही कुत्री ताव मारत असतात. या कुत्र्यांच्या कळप रस्त्यावर दिसला की सामान्य माणसेही बाजूला सरकतात. शाळेत जाणार्या मुलांनाही यामुळे अडथळा निर्माण होत आहे.
कुत्रे चावल्याच्या घटनाही घडत असून, तत्काळ लस उपलब्ध न होण्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी राजगुरूनगर नगरपरिषदेकडे यावर तातडीने उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप ठोस पावले उचलली गेली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.