रस्त्याचे रुंदीकरण वाहनचालकांच्या जिवावर; लोहगावमधील परिसरातील स्थिती

रस्त्याचे रुंदीकरण वाहनचालकांच्या जिवावर; लोहगावमधील परिसरातील स्थिती

धानोरी : पुढारी वृत्तसेवा : लोहगावमधील संतनगर ते नगर महामार्गाला जोडणार्‍या पाटील वस्ती डीपी रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम अतिशय संथगतीने चालू आहे. रुंदीकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यांमध्ये वाहने पडण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने लोहगाव डीपी रस्त्याचे रुंदीकरण वाहनचालकांच्या जिवावर बेतत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. संतनगर ते नगर महामार्गाला जोडणारा पाटील वस्ती डीपी रस्ता सुमारे तीस मीटर रुंदीचा आहे. मात्र, अनेक वर्षांपासून या रस्त्याचे रुंदीकरण रखडलेले आहे. या विषयी दै. 'पुढारी'मध्ये वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या वेळी या रस्त्याचे काम चालू होणार, असे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले होते. सुमारे तीन किलोमीटर लांबीचा हा रस्ता असून, सध्या फक्त अकराशे मीटर रस्त्याचेच रुंदीकरण होणार असून, जागेच्या उपलब्धतेनुसार एक ते दोन मीटर रुंदीकरण होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

या रस्त्यावर खराडी, चंदननगर भागात कामाला जाणार्‍या नागरिकांची मोठी वर्दळ असते. या रस्त्यावर वारंवार अपघात होत असून, अनेक झाडे तोडण्यात आली आहेत, असे येथील रहिवासी नितीन रायभान यांनी सांगितले. गोठण ओढा परिसरातील वळणावर बुधवारी दुपारी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्या वेळी शिवसेनेचे श्रीकांत खांदवे आणि नितीन रायभान यांनी रुंदीकरणाच्या कामाची देखरेख करणार्‍या गौरव केदारी यांची कानउघाडणी केल्यानंतर तातडीने काम पूर्ण करणार असल्याचे केदारी यांनी सांगितले.

रस्त्याचे काम अतिशय संथगतीने चालू आहे. वारंवार अपघात होत आहेत. वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत. रुंदीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे.

– श्रीकांत खांदवे, युवासेना उपविभाग अधिकारी, वडगाव शेरी विधानसभा.

या कामाची माहिती घेतो. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन तातडीने काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात येतील.

– अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता, पथ विभाग.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news