Pune : आचारसंहितेचा भंग न होणाऱ्या फ्लेक्सलाच परवानगी.. | पुढारी

Pune : आचारसंहितेचा भंग न होणाऱ्या फ्लेक्सलाच परवानगी..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी येणार्‍या अनुयायांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, यासाठी योग्य ती व्यवस्था करा तसेच आचारसंहितेचा भंग होणार नाही अशाच फ्लेक्सला परवानगी द्या, अशा सूचना महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रशासनाला केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या नियोजनासाठी बुधवारी महापालिकेत बैठक झाली. या वेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., सर्व परिमंडल उपायुक्त, क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त, उपायुक्त माधव जगताप, विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल, पथविभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर, पाणीपुरवठा विभागप्रमुख नंदकिशोर जगताप, सुरक्षा विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील, मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे आदी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. आंबेडकर उद्यानात मांडव, मॅटिंग टाकणे, फ्लेक्समुळे पुतळा झाकला जाणार नाही, याची दक्षता घेणे, आचारसंहितेच्या दृष्टिकोनातून फ्लेक्सच्या नियमित परवानगीचा आग्रह धरण्यात येईल, पिण्याचे पाणी, टँकर, फिरती स्वच्छतागृहे, परिसर स्वच्छतेसाठी तीन शिफ्टमध्ये कर्मचार्‍यांची नियुक्ती, दोन डॉक्टर, फार्मासिस्ट, नर्स व सहायकांसह फिरत्या दवाखान्याची व्यवस्था, पुरेशी प्रकाशव्यवस्था, ध्वनिवर्धक, जनरेटर बॅकअ‍ॅप आदी व्यवस्था करणे आदी सूचना या बैठकीत देण्यात आल्या.

हेही वाचा

Back to top button