

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत 930 अधिकारी आणि साडेदहा हजार पोलिस कर्मचार्यांचा बंदोबस्त असणार आहे. यासह आयुक्तालयाच्या हद्दीतील दहा संवेदनशील मतदार केंद्रांसाठीही विशेष बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. दरम्यान, बंदोबस्ताचे हे प्राथमिक नियोजन असून, प्रत्यक्ष मतदानाच्या पंधरा दिवस अगोदर आवश्यकतेनुसार बंदोबस्तामध्ये बदल करण्यात येऊ शकतो.
केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केल्यापासून निवडणुकीच्या वातावरणात दिवसेंदिवस रंगत वाढत असून, दुसरीकडे जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणेकडूनही चोख व्यवस्थेसाठी प्रयत्न केले जात आहेत. निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे जम्बो नियोजन केले आहे. पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रामुख्याने पुणे लोकसभेसह शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा काही भाग येतो. त्यामुळे पोलिसांनी दोन टप्प्यांत बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यात (7 मे) बारामतीचे मतदान होणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेला संपूर्ण खडकवासला विधानसभा संघ आणि पुरंदर विधानसभेचा काही भाग पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत येतो. या मतदानाच्या दिवशी 370 पोलिस अधिकारी, साडेतीन हजार पोलिस कर्मचारी, 475 होमगार्ड, निमलष्करी दलाच्या दोन कंपन्या आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन कंपन्या असा बंदोबस्त असणार आहे.दुसर्या टप्प्यात (13 मे) पुणे लोकसभा आणि शिरूर लोकसभेसाठी मतदान होणार आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघ शिरूर लोकसभेचा भाग आहे. या दिवशी 560 पोलिस अधिकारी, सात हजार पोलिस कर्मचारी, 1900 होमगार्ड, निमलष्करी दलाच्या तीन कंपन्या आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन कंपन्या असा बंदोबस्त असणार आहे.
जिल्ह्यात 23 संवेदनशील मतदान केंद्रे असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यापैकी 10 संवेदनशील केंद्रे पुणे लोकसभा मतदारसंघात आहेत. या मतदान केंद्रांवर निमलष्करी दलाचे पाच हजार कर्मचारी आणि शहर पोलिसांचे दोन हजार कर्मचारी असा अतिरिक्त बंदोबस्त नेमण्यात येणार आहे.
हेही वाचा