देहूफाटा येथील रस्ता अडवू नये: जिल्हाधिकारी

देहूफाटा येथील रस्ता अडवू नये: जिल्हाधिकारी

देहूगाव : देहूरोड येथील देहू फाटा येथे संरक्षण विभागाच्या वतीने बॅरिकेड्स लावून रस्ता अडविण्यात आला आहे. यासंदर्भात संरक्षण विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली आहे. हा सार्वजनिक रस्ता असून संरक्षण विभागाने या ठिकाणी कुणाची अडवणूक करू नये. लवकरच संरक्षण विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत बॅरिकेट लावून वाहनांची अडवणूक करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी देहूगाव येथे बुधवारी केले.

देहू देवस्थानच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी सुहास दिवसे, उपजिल्हाधिकारी संजय असवले, तहसीलदार जयराज देशमुख, नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदुलकर, गणेश दानी, देहू देवस्थान संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तममहाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख विशालमहाराज मोरे, माणिकमहाराज मोरे, विश्वस्त संजयमहाराज मोरे, देहूच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, नगराध्यक्षा पूजा दिवटे, कार्यालयीन अधीक्षक रामराव खरात, बांधकाम अभियंता संघपाल गायकवाड, नगरसेवक प्रवीण काळोखे, योगेश काळोखे, प्रवीण काळोखे, तलाठी अतुल गित्ते, सूर्यकांत काळे आदी उपस्थित होते. या वेळी जिल्हाधिकारी दिवसे बोलत होते.

संरक्षण विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा करणार

पुणे-मुंबई महामार्गालगत देहूरोड ते निगडीदरम्यान देहूफाटा ते देहूगाव पाच ते सहा किलोमीटरचा रस्ता हा पूर्वीपासून पालखी मार्ग म्हणून ओळखला जातो. परंतु, या ठिकाणी संरक्षण विभागाचे अधिकारी बॅरिकेड्स लावून जड वाहनांना प्रवेश बंदी करत आहेत. या आठवड्यात दोन वेळा लोखंडी कमान उभी करण्याचा प्रयत्न स्थानिक नागरिकांनी हाणून पडला. या संदर्भात ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांना यातून मार्ग काढण्याची मागणी केली.

देहू नगरपंचायतीने आराखडा तयार करावा

देहूगावातील समस्या वेगळ्या आहेत. परंतु, यात्रा आणि पालखी प्रस्थान सोहळ्यातील समस्या वेगळ्या आहेत. पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान काय काय समस्या निर्माण होतात त्याची माहिती घ्यावी आणि त्याप्रमाणे आराखडा तयार करावा, अशा सूचना नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांना जिल्हाधिकारी दिवसे यांनी दिल्या आहेत. इंद्रायणीचा घाट स्वच्छ केला म्हणजे प्रश्न सुटला असे नाही. तर, या भागातील सांडपाणी इंद्रायणी नदीत जात आहे. त्यामुळे पाणी दूषित होऊन जलपर्णी वाढत आहे. त्यासाठी पाणी शुद्धीकरण (एसटीपी) केंद्र निमार्ण करणे आवश्यक आहे. यासाठी नगरपंचायतीने लवकरात लवकर कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सूचना दिल्या.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news