

पुणे : मुळा-मुठा नदी सुशोभीकरण प्रकल्पासाठी तब्बल 22.26 हेक्टर शासकीय जागा नाममात्र दराने महापालिकेला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या जमिनींसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 116 कोटींचा मोबदला मागितला होता. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्तक्षेपामुळे हा मोबदला नाममात्र दराने निश्चित होणार आहे. सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वॉररूममधील हा प्रकल्प प्राधान्याने पुढे न्यायचा असल्याचे स्पष्ट करीत तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.(Latest Pune News)
संरक्षण खाते, महिला व बालकल्याण विभाग, बोटॅनिकल गार्डन आणि वन विभाग यांच्या ताब्यातील या जागांचे भूसंपादन महापालिकेतर्फे करण्यात येणार आहे. मात्र, या जमिनीच्या मोबदल्यात जिल्हाधिकारी कार्यालयाने 116 कोटी रुपयांची मागणी महापालिकेकडे केली होती. यासंदर्भात अजित पवार यांनी सोमवारी बैठक घेतली.
या बैठकीला महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. सुशोभीकरणाच्या 44.4 किलोमीटर लांबीच्या कामासाठी विविध विभागांच्या जमिनी आवश्यक आहेत. त्यात मुंढवा येथील महिला व बालकल्याण विभागाची 0.77 हेक्टर, बोटॅनिकल गार्डनची 3.4 हेक्टर, तर कोरेगाव पार्क येथील वन विभागाची तब्बल 11 हेक्टर जागा महत्त्वाची आहे. याशिवाय संगमवाडी येथील संरक्षण खात्याच्या 7 हेक्टर जागेवर कामाला आधीच परवानगी मिळाली आहे.
पालिका-संरक्षण खाते यांच्यात येत्या आठवड्यात सामंजस्य करार
संरक्षण विभागाला याबदल्यात 32 कोटींची विकासकामे महापालिका करून देणार असून, ती कामे संरक्षण खात्याने सूचित केलेल्या ठिकाणीच होतील. येत्या आठवड्यात यासंदर्भात महापालिका आणि संरक्षण खाते यांच्यात सामंजस्य करार होणार आहे.
एकतानगरीलाही 300 कोटींचा निधी
नदीकाठ विकासाबरोबरच एकतानगरी परिसरासाठी 300 कोटींचा निधी मागविण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन निधीतून ही मागणी करण्यात आली असून, निधी शिल्लक असल्यास तातडीने मंजुरी दिली जाईल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले. तसेच, नदीकाठ विकास प्रकल्पाला गती देण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.