

पुणे: खराडी परिसरात एका इमारतीत मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी, चंदनगर पोलिसांनी एका महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये स्पा मालक, मॅनेजरचा समावेश आहे.
संदीप चव्हाण, रोहित शिंदे, गोपाळ, तसेच स्वाती ऊर्फ श्वेता विजय सूर्यवंशी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस शिपाई वर्षा सावंत यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Pune News)
चंदननगर-खराडी भागातील एका फिटनेस क्लबजवळ असलेल्या इमारतीत आरोपी मसाज पार्लर चालवित होते. या मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवयास सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खात्री केली.
पोलिसांनी मसाज पार्लरवर छापा टाकून कारवाई केली. मसाज पार्लरमधून तीन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे. चौकशीत मसाज पार्लरमधील तरुणींना आरोपींनी जादा पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे तपास करत आहेत.
शहर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. पोलिस आयुक्तांनी मसाज पार्लरमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकारांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. गेल्या चार दिवसांत पोलिसांनी तीन मसाज पार्लरवर छापे टाकून कारवाई केली आहे. मार्केट यार्ड, तसेच पुणे-सातारा रस्त्यावरील धनकवडी भागातील मसाज पार्लरवर कारवाई करून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.