

धायरी : सिंहगड रस्ता परिसरातील लगडमळा येथे मुठा उजवा कालव्यालगत खडकवासला धरणातून पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोठ्या व्यासाच्या दोन लोखंडी जलवाहिन्या आहेत. या जलवाहिन्या येथे सुरू असलेल्या अनधिकृत रेडिमिक्स काँक्रीट प्लांटधारकांनी रस्त्यासाठी कोणालाही न घाबरता बिनधास्त रेडिमिक्स काँक्रीटच्या राडारोड्याने गाडून टाकल्याचे दै. ‘पुढारी’च्या पाहणी दौऱ्यात आढळून आले आहे. येथे तीन हजार व बावीसशे एमएम व्यासाच्या दोन जलवाहिन्या आहेत. याच परिसरात कालव्यालगत सात अनधिकृत रेडिमिक्स काँक्रिटीकरणाचे प्लांट आहेत.(Latest Pune News)
या प्लांटची अवजड वाहने येथून चोवीस तास ये-जा करतात. प्लांटमध्ये रेडिमिक्स भरण्याकरिता येणाऱ्या वाहनांसाठी चक्क येथील जलवाहिन्यांवर रेडिमिक्स काँक्रिटीकरणाचा राडारोडा टाकून बुजविण्यात येऊन त्यावरून रस्ता करण्याचे काम करण्यात येत आहे. यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाइपलाइनवर मोठे संकट ओढवले आहे.
या राडारोड्यामुळे जर ही जलवाहिनी फुटली, तर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊन मोठे पाण्याचे संकट शहरावर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. या अनधिकृत प्लांटवर गुन्हा दाखल करून तातडीने बंद करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
याशिवाय, काँक्रीट मिक्सर गाड्यांमधून उरलेले सिमेंट-सांडपाणी रस्त्यावर सांडल्यामुळे रस्त्यांवर दगडासारखे कठीण थर तयार झाले आहेत. त्यामुळे गतिरोधकासारखे अडथळे निर्माण होऊन दुचाकीस्वार, शालेय बस आणि रुग्णवाहिका अडचणीत सापडत आहेत.
परिसरात धूळ व सिमेंटमुळे प्रदूषण वाढले असून, नागरिकांना श्वसनाचे त्रास, ॲलर्जी व डोळ्यांचे विकार भेडसावत आहेत. रात्री मोठ्या आवाजात सुरू असलेल्या मिक्सिंगमुळे रहिवाशांची झोपमोड होत आहे. पावसाळ्यात हेच सिमेंट नाल्यात वाहून जाऊन गटारे तुंबणे आणि नदीपात्र प्रदूषित होण्याचा धोका आहे.
मनसे पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, तातडीने कारवाई झाली नाही तर स्थानिक नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरू; मग जबाबदारी महापालिका आणि पाणीपुरवठा विभागाची असेल.
यासंदर्भात खडकवासला मनसेच्या वतीने पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता नंदकिशोर जगताप यांना निवेदन देण्यात आले. या वेळी मनसे वाहतूक सेना पुणे शहराध्यक्ष शिवाजी मते पाटील, विजय मते, बाळासाहेब मंडलिक, सिद्धार्थ पोकळे व मंगेश शिंदे उपस्थित होते.
याबाबत संबंधित महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
सिंहगड रस्त्यावर अवैध आर.एम.सी. प्लांटमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची आम्ही पाहणी करीत आहोत. लवकरच आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.
सतीश जाधव, कार्यकारी अभियंता, स्वारगेट पाणीपुरवठा विभाग