राजेंद्र कवडे देशमुख
बावडा : चारचाकी व दुचाकी वाहनांची वाढती संख्या, प्रत्येकाला झालेली घाई व वाहनांचा वाढता वेग, तर दुसर्या बाजूला वाहतूक सुरक्षिततेच्या नियमांकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे प्रत्येक वर्षी अपघातांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे अपघातामध्ये मृत्युमुखी पडून अथवा जखमी होऊन अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. अपघातांची वाढती संख्या ही एक सामाजिक समस्या बनली आहे. या समस्येकडे शासनाबरोबर प्रत्येक नागरिकाने गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रात 2021 मध्ये 29 हजारांहून अधिक रस्ते अपघात झाले आणि यामध्ये 13 हजार 346 लोक मरण पावले आहेत, तर हजारोंच्या संख्येने लोक जखमी झाले. सन 2020 च्या तुलनेत सन 2021 मध्ये रस्ते अपघातात सुमारे 17 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर मृत्यू आणि जखमींच्या संख्येतही 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रत्येक वाहनचालकाने वाहन चालवताना आपली घरी आई-वडील, पत्नी, मुलगा, बहीण आदी वाट पाहत आहेत, कुटुंबाचा उदरनिर्वाह आपल्यावर अवलंबून आहे, याची क्षणोक्षणी जाणीव ठेवणे आवश्यक आहे.
तरुणाईला वेगाचे वेड आहे, त्यामुळे अपघातांमध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. राज्य शासनाने रस्त्याची कामे करताना धोकादायक वळणे व अपघातांची ठिकाणे दुरुस्त करणे गरजेचे आहे. तसेच अनेक वेळा रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या काटेरी झुडपांमुळे समोरून येणारे वाहन दिसून न आल्याने अपघात होतात. त्यामुळे ग्रामीण भागात काटेरी झुडपे काढणेबाबत नियोजन होणे गरजेचे आहे.
काळजी घेऊनही जर दुर्दैवाने अपघात घडलाच तर काही वेळा अपघातातील जखमींना लवकर मदत मिळत नाही. अपघात झाल्यानंतर प्रारंभीचा काळ गोल्डन अवर म्हणून ओळखला जातो. या वेळेत मदत मिळाल्यास जखमींचे प्राण वाचण्यास मदत होते. त्यामुळे समाजातील प्रत्येकाने घाई असतानाही थोडा वेळ थांबून अपघातातील जखमींना मदत करावी तसेच रुग्णवाहिका उपलब्धतेसाठी 108 ला फोन करून आपले सामाजिक दायित्व पार पाडावे.
बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून स्पीडगन मशिनद्वारे वाहने वेगात चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. वाहनचालकांनी व नागरिकांनी सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत.
– नंदकिशोर पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती
बर्याच वेळा हेल्मेटच्या वापरामुळे अनेक दुचाकीस्वारांचे प्राण वाचलेले आहेत, तरीही हेल्मेट वापरण्याचे प्रमाण वाढत नाही हे दुर्दैवी आहे.
– डॉ. समीर बंडगर, वैद्यकीय तज्ज्ञ, अकलूज