

पुणे: भारतात दरवर्षी जन्माला येणार्या बाळांपैकी 13 टक्के बाळांचा जन्म मुदतपूर्व असतो. तर, 17 टक्के नवजात बालके कमी वजनाची असतात, असा निष्कर्ष नुकत्याच झालेल्या आरोग्य सर्वेक्षणातून समोर आला आहे.
ग्रामीण भागात मातृत्व आरोग्यसेवा पोहचविण्यात अजूनही मोठी कमतरता आहे. परिणामी, मुदतपूर्व जन्म होणार्या बाळांची संख्या वाढते आहे, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे. भारताच्या लोकसंख्या आरोग्य सर्वेक्षणानुसार, देशात सुमारे 13 टक्के बाळांचा जन्म वेळेपूर्वी होतो, तर 17 टक्के बाळे जन्मत: कमी वजनाची असतात. (Latest Pune News)
या प्रतिकूल जन्म परिणामांमागे हवेतील प्रदूषण हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे संशोधनात स्पष्ट झाले आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) दिल्ली, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस, मुंबई आणि युनायटेड किंगडम व आयर्लंडमधील संशोधन संस्थांच्या तज्ज्ञांनी हा अभ्यास केला आहे.
गर्भधारणेदरम्यान संतुलित आहार घेणे आवश्यक असते. आईचे आरोग्य आणि आहार नीट नसेल तर बाळही अशक्त होते. तिच्या शरीरातील आयर्न, फॉलिक अॅसिड, आयोडिन यांचे प्रमाण कमी असेल तर बाळाला पोषण नीट मिळणार नाही. अशा परिस्थितीत प्रिमॅच्युअर बाळ होण्याची शक्यता जास्त असते. गर्भवतीसाठी आयर्न, कॅल्शियम, मल्टिव्हिटॅमिन्स खूप गरजेची आहेत. तसेच, स्त्री गर्भधारणेसाठी शारीरिक व मानसिकद़ृष्ट्या तयार आहोत का, हेही तपासून घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
काय आवश्यक?
योग्य पोषण. पुरेशी विश्रांती आणि गर्भधारणांमधील योग्य अंतर महत्त्वाचे आहे.
गर्भधारणा ठरविण्याआधी महिलेला स्वतःच्या हिमोग्लोबिन, वजन, रक्तदाब, थायरॉइड, शुगर, रक्तगट आणि थॅलेसेमियाबाबत माहिती असणे गरजेचे आहे.
स्त्री शारीरिक व मानसिकद़ृष्ट्या तयार आहे आणि तिने तीन महिने फॉलिक अॅसिड घेतले आहे, तेव्हाच तिने गर्भधारणेचा निर्णय घ्यावा.
भारतात दरवर्षी 3.5 कोटींपेक्षा अधिक प्रिमॅच्युअर बाळे जन्माला येतात. ही संख्या जगात सर्वाधिक आहे. यातील अनेक बाळांचे वजन खूपच कमी असते. बहुतेक महिलांची पहिली तपासणी गर्भधारणेनंतर खूप उशिरा होते. चौथ्या-पाचव्या महिन्यात किंवा कधी सातव्या महिन्यात त्यांची पहिली तपासणी होते. गर्भवतींमध्ये अॅनिमियाचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. रक्तशर्करा, थायरॉइड यांची वेळेवर तपासणी होत नाही. महिलांमध्ये पोषणाबाबत जागरूकतेचा अभाव दिसून येतो. गर्भधारणेपूर्वी तपासण्या केल्या गेल्या पाहिजेत. त्या बाळासाठी आई शारीरिकद़ृष्ट्या तयार आहे का? हे पाहण्यासाठी तपासण्या आवश्यक आहेत.
- डॉ. सुनीता तांदूळवाडकर, प्रसूती व स्त्रीरोग विभागप्रमुख, रुबी हॉल क्लिनिक