पुणे: डेक्कन जिमखाना भागातील प्रसिद्ध इराणी कॅफेतील बन मस्कात काचेचा तुकडा आढळून आल्याचा प्रकार सोशल मीडियामध्ये एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समोर आला आहे. आकाश जलगी हे सिंहगड रोड परिसरात राहण्यास आहेत.
डेक्कन येथील या कॅफेत चांगल्या पद्धतीचे खाद्य पदार्थ मिळत असल्याने ते आणि त्यांची पत्नी डेक्कन जिमखाना भागातील इराणी कॅफेत आले होते. त्या वेळी त्यांना देण्यात आलेल्या बन मस्कात त्यांना काचेचा तुकडा आढळला. (Latest Pune News)
सुरुवातीला त्यांना बन मस्कामध्ये आढळलेला तुकडा हा बर्फाचा आहे, असे वाटले. मात्र, नंतर त्यांनी बनमस्का नीट पाहिला असता तो काचेचा तुकडा असल्याचे निदर्शनास आले. यावर त्यांनी कॅफेतील वेटर आणि मालकांना जाब विचारला.
तेव्हा मालकांनी त्यांची माफी मागितली, तसेच त्यांच्याकडून बिल घेतले नाही, असे समाजमाध्यात प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडीओत आकाश यांनी म्हटले आहे. काचेचा तुकडा आढळून आल्यानंतर आकाश जलगी यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे तक्रार दिली आहे.