

पुणे: हॉटेलमध्ये कुटुंबासह जेवण करण्यासाठी गेलेल्या एका महिलेला दिलेल्या सूपमध्ये झुरळ सापडल्याची घटना कॅम्पमधील एका हॉटेलमध्ये घडली. याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात संबंधित हॉटेलचे मालक आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अश्विनी रवी शिरसाठ (वय 31, रा. दापोडी, मुंबई-पुणे रस्ता) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भिवंडी दरबार हॉटेलचे व्यवस्थापक अमन हुसेन शेख (वय 24, रा. आझादनगर, भिवंडी) याच्यासह मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरसाठ कुटुंबीय मागील महिन्यात 16 जून रोजी कॅम्पमधील भिवंडी दरबार हॉटेलमध्ये रात्री जेवण करण्यासाठी गेले होते. (Latest Pune News)
जेवण सुरू करण्यापूर्वी त्यांना सूप देण्यात आले. तेव्हा शिरसाठ यांना दिलेल्या सूपमध्ये झुरळ आढळले. या घटनेनंतर शिरसाठ यांनी हॉटेल व्यवस्थापकासह कामगारांना जाब विचारला. तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार आली होती. पोलिसांनी संबंधित हॉटेलमधील सूप अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) तपासणीसाठी पाठवले होते. याबाबतचा अहवाल मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.