लोणी काळभोर : पूर्व हवेलीतील भूमाफियाने रिंगरोडबाधित शेतकर्यांची आणि त्याच्याकडे कोट्यवधी रुपये गुंतवलेल्या गुंतवणूकदार, अशी दोघांची फसवणूक केल्याचे चित्र समोर आले आहे. रिंगरोडच्या आखणीची माहिती या भूमाफियाला अगोदरच मिळाली होती. रिंगरोड आराखड्याची गटनिहाय इत्थंभूत माहिती मिळाल्याने नेमक्या याच गटांची शेतकर्यांना अंधारात ठेवून भूसंपादनापूर्वी खरेदी या भूमाफियाने केली आहे. याच गटावर त्याने गुंतवणूकदारांचे पैसे लावले, हे प्रकरण पाहाता आराखडा तयार करणारे रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी या भूमाफियाला सामील आहेत की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. शेतकर्यांसह गुंतवणूकदारांची सुद्धा यामध्ये फसवणूक झाली असल्याने खळबळ उडाली आहे.
वास्तविक ही फसवणूक भूमाफियांकडून झाली एवढ्यावरच न थांबता आराखडा लिक करणार्या अधिकार्याकडूनही याला खतपाणी मिळाले असल्याचे दिसते. रस्ते विकास महामंडळाकडून रस्त्याची आखणी झाली त्या वेळी कोणत्या गटातून रिंगरोड जाणार, हे त्या अधिकार्यांनाच माहिती होते व त्याच गटांची खरेदी या भूमाफियाने केल्यामुळे भूमाफिया व शासकीय अधिकारी यांनी संगनमत करून शेतकरी व गुंतवणूकदार यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली असल्याचे दिसत आहे.
पूर्व हवेलीतील या बड्या भूमाफियाने संपादनापूर्वी रिंगरोडमध्ये जाणार्या अनेक शेतकर्यांच्या जमिनी त्यांना अंधारात ठेवून खरेदी केल्या आणि त्यांना पाचपट मोबदल्यापासून वंचित ठेवले. आता या माफियाला तो पाचपट मोबदला शेकडो कोटी रुपयांच्या आसपास मिळणार असल्याने त्याने पाच महिन्यांत दुप्पट परतावा देतो, असे आमिष दाखवून शेतकर्यासह, शासकीय अधिकारी, उद्योगपती, स्थानिक नागरिक, शिरूर, हवेली, पुरंदर, पुणे शहर, अहमदनगर, मुंबई येथील लोकांकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक मिळविली आहे. शासकीय लालफितीत या भूमाफियाला मिळणारा मोबदला अडकल्याने व पैसे मिळण्यास विलंब झाल्याने गुंतवणूकदारांना वेळेवर पैसे मिळाले नाहीत. यापुढेही पैसे मिळणार असल्याची शाश्वती नसल्याने या रिंगरोड गुंतवणुकीचा फुगा फुटला व फसवणूक झाल्याची ओरड सुरू झाली आहे.
हेही वाचा