पुणे : रिक्षाचालकांना शिस्त हवीच; संघटनांचे मत

पुणे : रिक्षाचालकांना शिस्त हवीच; संघटनांचे मत

पुणे : शहरातील नवे रिक्षाचालक युनिफॉर्म परिधान न करताच सर्रासपणे रिक्षांमधून प्रवासी वाहतूक करतात. यासंदर्भात दै. 'पुढारी'ने शुक्रवारी (दि. 30) रोजी वृत्त प्रसिध्द केले होते. त्याची रिक्षा संघटनांनी दखल घेत कौतुक केले आहे आणि त्यांच्याकडील सभासदांमध्ये याबाबतची जागृती करण्यासाठी मोहीम हाती घेणार असल्याचे त्यांनी दै. 'पुढारी' शी बोलताना सांगितले.

लवकरच सभासदांमध्येजागृती करण्यासाठी मोहीम

शहरातील काही भागात काही नव्या रिक्षाचालकांकडून अनुचित प्रकार घडले आहेत. त्यापार्श्वभूमीवर नव्या रिक्षाचालकांना शिस्त लागावी, आणि मोटार वाहन कायद्यातील नियमांचे नव्या रिक्षाचालकांकडून पालन व्हावे, त्यांनी युनिफॉर्म, बॅच-बिल्ला परिधान करून प्रवाशांशी नम्रपणाने वागावे, याकरिता दै. 'पुढारी'कडून शुक्रवारी हे वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते. त्याची दखल घेत रिक्षाचालकांनी बातमीसंदर्भात आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या असून, युनिफॉर्मबाबत आम्ही जनजागृती करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

दै. 'पुढारी'ने सत्य परिस्थिती आणि वास्तव मांडले आहे. युनिफॉर्ममुळे रिक्षाचालकांना शिस्त येते. युनिफॉर्म न घालण्याचा बेशिस्तपणा हानिकारकच आहे. कायद्याने त्यांना तो ड्रेस कोड दिलेला आहे. या आपल्या मताशी आम्ही सहमत आहोत.

– बाबा कांबळे,
अध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षा पंचायत.
(राष्ट्रीय अध्यक्ष, ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन)

रिक्षा व्यवसायिकांना गणवेश परिधान करणे बंधनकारक आहे. परंतु, बहुसंख्य रिक्षाचालक त्याकडे दुर्लक्ष करीत असतात. आम्ही पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशन, पुणे शहर रिक्षा टेम्पो मेन्स युनियनच्या पातळीवर मोहीम नक्कीच हाती घेऊ.

– प्रकाश झाडे,
कार्याध्यक्ष, पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशन,
पुणे शहर रिक्षा टेम्पो मेन्स युनियन

रिक्षा व्यवसायाच्या गणवेशासंदर्भात दै पुढारीने जो विषय मांडला. तो व्यावसायिक व प्रवासी यांच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे. त्याचे आम्ही स्वागत करून फेडरेशनच्या पातळीवर योग्य कार्यवाही करू.

– आनंद तांबे,
अध्यक्ष, पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशन, पुणे

रिक्षाचालकांना युनिफॉर्म हा हवाच. त्यामुळे प्रवाशांना खरा रिक्षाचालक ओळखायला मदत होते. शिवनेरी रिक्षा संघटनेकडून शासनाला व प्रादेशिक परिवहन कार्यालायाला मागणी आहे की, एकच ड्रेस कोड रिक्षाचालकांना द्यावा. दै. 'पुढारी'च्या बातमीचे आम्ही स्वागत करतो.

– आबा बाबर,
संस्थापक अध्यक्ष, शिवनेरी रिक्षा संघटना

रिक्षा गणवेशाविषयी दै. 'पुढारी'ने जी बातमी प्रसिद्ध केली, ती कौतुकास्पद आहे. सर्व रिक्षाचालकांनी प्रवाशांच्या मनात विश्वास निर्माण व्हावा आणि आपली प्रतिमा चांगली करण्यासाठी पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट हा गणवेश घालावा.

-आनंद अंकुश, अध्यक्ष,
आम आदमी रिक्षाचालक संघटना

रिक्षाचालकांनी पांढरा शर्ट व खाकी पॅन्ट परिधान करणे, तसेच बॅच-बिल्ला लावून प्रामाणिकपणे व्यवसाय करावा, तसेच प्रवासी नाकारू नये.

– शफीक पटेल,
संस्थापक अध्यक्ष, आझाद रिक्षाचालक संघटना

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news