

पुणे : पन्नास लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर प्रत्येक महिन्याला साडेचार लाख रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवत एका निवृत्त आयपीएस अधिकार्यांना दोघांनी गंडा घातला. त्यासोबतच आणखी एका गुंतवणूकदाराला तब्बल दीड कोटींचा गंडा घातला आहे. ही घटना गुरूवारी (दि.८) उघडकीस आली.
याप्रकरणी, डेक्कन पोलिस ठाण्यात मारूती शंकरराव महेशगौरी (वय ८०, रा. विशालनगर, वाकड) यांनी दिलेल्या फिर्यादावरून राजीव अशोक केंद्रे (सध्या रा. दुबई, मुळ गाव जळकोट, जि. लातूर) आणि हर्षल अशोक कुलकर्णी (रा. कोथरूड) या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेशगौरी हे निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत. आरोपी केंद्रे आणि कुलकर्णी या दोघांसोबत त्यांचा परिचय भांडारकर रोड येथे एका व्यक्तीच्या माध्यमातून झाला होता. आरोपींनी त्यांची दुबई येथे कंपनी आहे. त्या कंपनीत गुंतवणूक केल्यास दर महिन्याला साडेचार लाखांचा परतावा देण्याचे आमिष महेशगौरी यांना दाखविले. २०२१ ते २०२३ या दरम्यान महेशगौरी यांच्याकडून आरोपींनी ५० लाख रुपये उकळले. मात्र, कोणताही परतावा न देता सर्व रकमेचा अपहार केला. तसेच, फिर्यादी महेशगौरी यांच्यासोबतच आणखी एका गुंतवणूकदाराची आरोपींनी तब्बल दीड कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
याबाबत महेशगौरी यांनी नुकतीच डेक्कन पोलिसांत फिर्याद दिली आहे. आरोपी राजीव केंद्रे याच्यावर यापूर्वी देखील वाकड आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. डेक्कन पोलीस तपास करीत आहेत.