

भुसावळ – रेल्वेत हेड क्लार्क पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तब्बल नऊ लाख चौसष्ट हजार साठ रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार भुसावळात समोर आला आहे. या प्रकरणी प्रशांत लक्ष्मीनारायण अग्रवाल (रा. गडकरी नगर, भुसावळ) याच्याविरोधात बाजारपेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, वसंत जानबाजी ढोणे (वय ६६), हे रेल्वे पोलिस दलातून निवृत्त झालेले आहेत. त्यांची ओळख एका परिचित महिलेमार्फत प्रशांत अग्रवाल याच्याशी झाली होती. ओळखीचा गैरफायदा घेत अग्रवाल याने ढोणे यांचा मुलगा वैभव याला रेल्वेतील हेड क्लार्क पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. यासाठी त्याने सुरुवातीला सात लाख रुपये देण्याची अट ठेवली आणि नऊ महिन्यांत नियुक्तीपत्र मिळेल असे सांगितले.
ढोणे यांनी विश्वास ठेवून सुरुवातीला चार लाख रुपये दिले आणि नंतर टप्प्याटप्प्याने एकूण ९,६४,०६० रुपये अग्रवाल याला दिले. काही दिवसांनी अग्रवाल याने एक नियुक्तीपत्र दिले, परंतु त्यावर कोणतीही स्वाक्षरी वा अधिकृत शिक्का नसल्यामुळे ढोणे यांना संशय आला.
जेव्हा त्यांनी याबाबत विचारणा केली, तेव्हा अग्रवाल याने ते पत्र तात्पुरते असून लवकरच अधिकृत ऑर्डर देण्यात येईल असे सांगितले. मात्र त्यानंतरही नोकरीचे कोणतेही पत्र मिळाले नाही. उलट, अग्रवाल याने ढोणे यांचे फोन उचलणेही बंद केले. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वसंत ढोणे यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी तपास करून प्रशांत अग्रवाल याच्याविरोधात फसवणूक आणि विश्वासघात या कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.पोलीस अधिक तपास करत आहेत. रेल्वे नोकरीच्या नावाखाली होणाऱ्या अशा फसवणूक प्रकारांपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.