

रत्नागिरी : आपल्या बँक खात्यातून 2 कोटी रुपयांचा मनी लॉड्रिंगचा व्यवहार झाल्याची भीती घालून वृध्दाची तब्बल 61 लाख 19 हजार 80 रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणार्याच्या सायबर पोलिसांनी गुजरातमधून मुसक्या आवळल्या. फसवणुकीची ही घटना 21 डिसेंबर ते 27 डिसेंबर 2024 रोजी नाचणे परिसरात घडली होती.
नेपाल निताई चरण जना (रा. हरिदसन रेसिडन्सी ता. पालसाना जि. सुरत,गुजरात मूळ, रा. मोयना पं. बंगाल) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याने फिर्यादीला फोनवर आपण मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागातून बोलत असल्याची बतावणी केली. त्यानंतर तुमचे सिमकार्ड बंद होणार असून त्यानिमित्ताने पोलिसांकडे तक्रारीसाठी कॉल फॉरवर्ड करत असल्याचा बहाणा केला. त्याचाच साथिदार असलेल्या अन्य एकाने आपण पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करुन फिर्यादीला तुमचे कॅनरा बँकेत खाते उघडण्यात आलेले असल्याचे सांगितले. त्या खात्यातून 2 कोटी रुपयांचा मनि लॉड्रिंगचा व्यवहार झाला असल्याची भिती घालून फिर्यादीला त्याच बँक खात्यात रक्कम भरण्यास भाग पाडून त्यांची 61 लाख 19 हजार 80 रुपयांची फसवणूक केली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने रत्नागिरी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी अज्ञाताविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318(4), 319(2)3(5), माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66(सी) अन्वये गुन्हा दाखल केला होता. या संदर्भातील तपास करताना पोलिसांनी फसवणूकीच्या आर्थिक व्यवहारांबाबत बँकांकडून प्राप्त माहिती व तांत्रिक विश्लेष्णाव्दारे आरोपी नेपाल जना हा गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तपास पाठवून त्याला ताब्यात घेउन न्यायालयात हजर केल्यावर त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
गुन्ह्याचा तपास व आरोपीला अटक करण्यासाठी रत्नागिरीचे पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी व अपल पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक स्मिता सुतार, पोलिस हवालदार संदिप नाईक, अमोल गमरे, विक्रम पाटील, पोलिस काँस्टेबल नीलेश शेलार यांनी कामगिरी केली. फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांनी सतर्कतेचे आवाहन केले आहे.
कोणीही मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन नॅशनल सिक्युरिटी विभाग व इतर विभागातून बोलत आहोत, असे सांगून तुमचे सिमकार्डचा गैरवापर झाला असून त्याकरता तुमची चौकशी करायची असल्याचे खोटे सांगू शकतो. त्याद्वारे तो तुमची वैयक्तिक व बँकांची आर्थिक माहिती मागत असेल तसेच अकाऊंट व्हेरीफिकेशन करता पैसे ट्रान्सफर करा असे सांगत असेल, तर अशा कॉलवर विश्वास ठेवू नका. आपली वैयक्तिक बँक खात्यांची माहिती कोणालाही देऊ नका व अशा धमक्यांना बळी पडू नका.