मारुंजी : अहो साहेब, पाऊस उघडला आता तरी रस्त्यांची दुरुस्ती करा!

मारुंजी : अहो साहेब, पाऊस उघडला आता तरी रस्त्यांची दुरुस्ती करा!

मारुंजी(पुणे) : पावसाच्या उघडिपीनंतरही रस्त्यावर पडलेले मोठंमोठे खड्डे, कोणतेही निकष नसलेले गतिरोधक यामुळे मारुंजी, दत्तवाडी नेरे, कासारसाई, चांदखेड, जांबे येथील रहिवाशांचा जीव मेटाकुटीला आला आहे.

मणक्याच्या त्रासामुळे चालक त्रस्त

नोकरीनिमित्त हजारो नागरिक मारुंजी परिसरात राहत आहेत. त्यातच वाहतूककोंडी आणि खड्ड्यांच्या त्रासामुळे परिसरातील नागरिकांना मणक्याचा त्रास होऊ लागला आहे. ग्रामपंचायतकडून वारंवार सार्वजनिक बांधकाम विभाग व पीएमआरडीएशी पत्रव्यवहार करूनही रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्यामुळे आता वाहनचालक व नागरिक संबंधित विभागाला सोशल मीडियावरून विणवणी करत आहेत. साहेब पाऊस उघडला आता तरी रस्ते दुरुस्ती करा, अशी संतप्त होऊन मागणी करत आहेत. मात्र, झोपी गेलेल्या संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना नागरिकांच्या समस्यांशी काही घेणे देणे असल्याचे दिसत नाही.

लक्ष्मी चौक ते मारुंजी रस्त्यावर खड्डेच खड्डे

लक्ष्मी चौक ते मारुंजी रस्त्यावर बाराही महिने खड्डे, खडी, धूळ माती आढळून येते. या रस्त्याला कोणीच वाली राहिलेला दिसत नाही. ज्याच्या मनाला येईल तो रस्ता खोदून पाइपलाइन टाकत आहे. तर, कोणी स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या दुकानासमोर गतिरोधक तयार करत आहे. या रस्त्यावर जागोजागी खाऊ गल्ली तयार होत आहेत. त्यासाठी पाइपलाइन किंवा इतर कामासाठी विनापरवाना रस्ते खोदले जातात. त्यांना कोणीही विचारणा करीत नसल्यामुळे या संपूर्ण रस्त्यावर खड्डे आणि कोणत्याही नियमाला अनुसरून गतिरोधक तयार केले जात नसल्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे.

वाहतूककोंडीत भर

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे परिसरात जागोजागी वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मारुंजी परिसरातील वाहतूककोंडी नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे चालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्यामुळे चालकांनी लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news