Onion Market: कांद्याचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा
Onion Rate: इंदापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील आठवडे बाजारात कांद्याचे दर वाढल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे दिवाळीच्या तोंडावर किराणा मालासह खाद्यतेलाच्या दराने अचानक उसळी घेतली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
गेल्या दोन-तीन महिन्यांपूर्वी कांद्याचे दर प्रतिकिलो 10 ते 15 रुपये असे होते. त्यात नुकतीच वाढ होत प्रतिकिलो कांदा 25 ते 30 रुपये दराने विक्री होत आहे. परतीचा पाऊस व बदलत्या हवामानामुळे हळव्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तसेच शेतकर्यांनी साठवलेला जुना गावरान कांदा संपला असल्याने दराने उसळी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकर्यांना काहीसा दिलासा मिळत आहे. याशिवाय इतर भाजीपाल्याच्या किमतीतही वाढ झालेली आहे.
कांदा कोणाला रडविणार?
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत अनेक मुद्दे गाजणार आहेत. देशात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन (35 टक्के) महाराष्ट्रात घेतले जाते. त्यामुळे कांद्याचा वाढलेला बाजारभाव कोणाला फायदा करून देणार आणि कोणाला तोटा करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कांदा उत्पादकपट्ट्यात अद्याप नाराजी
केंद्र सरकारने नुकतेच कांद्यावरील 40 टक्के उत्पादन शुल्क 20 टक्क्यांवर आणले आहे, परंतु याचा किती फायदा होतो हा प्रश्नच आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान कांदा उत्पादक पट्ट्यात ज्यावेळी मतदान होते, त्यावेळी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील निर्बंध अंशतः उठवले होते. निवडणुकीत ऐनवेळी हा निर्णय घेण्यात आला होता, त्यामुळे शेतकरी वर्गातील नाराजी कमी झाली नाही. परिणामी कांदा उत्पादक पट्ट्यात नाराजी कायम आहे आणि याचा फटका सत्ताधार्यांना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे

