

Pune News: नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवरील (एनएसई) खातेदारांची संख्या 20 कोटींवर गेली आहे. अवघ्या आठ महिन्यांत खातेदारांची संख्या 3.10 कोटींनी वाढली आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणार्यांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल ठरला आहे.
एनएसईने ऑक्टोबर महिन्यात खातेदार संख्येचा वीस कोटींचा आकडा पार करत मैलाचा दगड पार केला आहे. एनएसईत आठ महिन्यांपूर्वी खातेदारांची संख्या 16.9 कोटी होती. गेल्या वर्ष-दीड वर्षात शेअर निर्देशांकाने घेतलेल्या उसळीमुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणार्यांची संख्या वाढली आहे. विशेषतः युवा पिढी गुंतवणुकीसाठी बँक ठेवींऐवजी तुलनेने अधिक परतावा देणार्या पर्यायांकडे वळताना दिसत आहे.
एनएसईने दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील खातेदारांची संख्या सर्वाधिक 3.6 कोटी आहे. विशेष म्हणजे दुसर्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे. येथील गुंतवणूकदारांची संख्या तब्बल 2.2 कोटी आहे. उद्योगस्नेही राज्य म्हणून पुढे येणारे गुजरात 1.8 कोटींसह तिसर्या स्थानी आहे. राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 1.2 कोटी गुंतवणूकदार आहेत. या पाच राज्यांत एकूण गुंतवणूकदांच्या 50 टक्के गुंतवणूकदार आहेत.
एसएसईचे मुख्य व्यवसाय विकास अधिकारी श्रीराम कृष्णन म्हणाले, केवळ आठ महिन्यांत तीन कोटींनी गुंतवणूकदारांची संख्या वाढली आहे. राष्ट्रीय शेअर बाजारासाठी हा मैलाचा दगड ठरला आहे. फेब्रुवारी महिन्यात जवळपास 17 कोटींच्या घरात गुंतवणूकदारांची संख्या होती.
कमी कालावधीत झालीली ही अपवादात्मक वाढ आहे. गुंतवणूकदारांचा आर्थिक वाढीवर असलेला विश्वास, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, मोबाइल ट्रेडिंग अॅप्लिकेशनचा वाढता वापर, महानगरांव्यतिरिक्त शेअर बाजाराचा झालेला प्रचार आणि प्रसार यांमुळे ग्राहकसंख्या वाढली आहे.