

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळीनिमित्त आज शुक्रवारी (१ नोव्हेंबर) शेअर बाजार नियमित वेळेत बंद राहील. पण, सायंकाळी ६ ते ७ दरम्यान एक तासासाठी विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्र (Diwali Muhurat Trading 2024) होईल. दिवाळीच्या दिवसापासून हिंदू संवत वर्ष २०८१ ची सुरुवात होते. हिंदू संवतच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज शुक्रवारी मुंबई स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) एक तासांसाठी खुला राहील. त्याला मुहूर्त ट्रेडिंग (Muhurat Trading) म्हटले जाते. दिवाळीनिमित्त आयोजित एक तासाचे विशेष ट्रेडिंग सत्र आहे.
गेल्या दिवाळीपासून निफ्टी २५ टक्क्यांनी वाढला आहे. तर बीएसई सेन्सेक्सने २३ टक्के रिटर्न दिला आहे. या कालावधीत बीएसई ५००, बीएसई मिडकॅप, स्मॉलकॅप निर्देशांकांनीदेखील वाढ नोंदवली आहे.
NSE आणि BSE ने वार्षिक दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग सत्र शुक्रवारी १ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ ते ७ या कालावधीत आयोजित केले आहे. दिवाळीनिमित्त बाजार सामान्य व्यवहारासाठी बंद आहे. तर विशेष ट्रेडिंग विंडो सायंकाळी केवळ एक तासासाठी उघडली जाणार आहे. प्री-ओपनिंग सत्र सायंकाळी ५:४५ ते ६ दरम्यानच्या वेळेत होईल, असे एनएसईने सांगितले आहे.
हे एक तासाचे ट्रेडिंग शूभ मानले जाते. कारण हे संवत २०८१ ची सुरु होण्याचे प्रतिक आहे. लक्ष्मी पूजन मुहूर्तावर गुंतवणूकदारांना शेअर्समध्ये व्यवहार करण्याची संधी मिळावी यादृष्टीने गुंतवणूकदारांसाठी हे ट्रेडिंग आयोजित केले जाते. या दिवशी बहुतांश गुंतवणूकदार लाँगटर्मच्या हिशोबाने शेअर्सची खरेदी करतात. तसेच काही शेअर्स गुंतवणुकीत नफा असल्यास ट्रेडिंगदरम्यान नफ्यातील काही भागाची विक्री करुन लक्ष्मीच्या प्रतिकात्मक स्वरूपात नफा घरी आणतात.