शेतीला दिलासा; निरा डावा कालव्याचे आवर्तन जूनपर्यंत सुरू राहणार

शेतीला दिलासा; निरा डावा कालव्याचे आवर्तन जूनपर्यंत सुरू राहणार
Published on
Updated on

बारामती : पुढारी वृत्तसेवा : निरा डावा कालव्याचे आवर्तन सुरू असल्याने ऐन उन्हाळ्यात शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. सध्या सुरू असलेले कालव्याचे आवर्तन जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहणार आहे. जिथे कालव्यातून अधिकच्या पाण्याची गळती होत होती, तेथे अस्तरीकरण झाल्याने पाणीगळती कमी होऊन इंदापूर तालुक्यातील शेतकर्‍यांनाही पुरेसा पाणीपुरवठा होत आहे. बारामती, इंदापूर आणि पुरंदर तालुक्यांतील काही भागांना वरदान ठरलेल्या निरा डावा कालव्याचे आवर्तन गेल्या तीन महिन्यांपासून सुरळीतपणे
सुरू आहे.

वीर धरणात कमी पाणीसाठा शिल्लक असूनही निरा डावा कालव्याचे आवर्तन सुरू आहे. आवर्तन सुरू असल्याने बारामती आणि इंदापूर तालुका ऐन उन्हाळ्यात हिरवागार आहे. बारामती आणि इंदापूर तालुक्यांतील छत्रपती, माळेगाव आणि सोमेश्वर या कारखान्यांसह परिसरातील ऊसतोडणी मजुरांनाही जनावरांसाठी, वापरासाठी कालव्याच्या पाण्याचा उपयोग होत आहे. बारामती, इंदापूर या तालुक्यांत उसाचे क्षेत्र मोठे आहे. कायमस्वरूपी आणि हक्काचे पाणी मिळत असल्याने उसासह तरकारी पिकांचे मोठे उत्पन्न या ठिकाणी घेतले जाते. मुबलक पाणी असल्याने शेतीतील उत्पन्न वाढले असून, शेतकर्‍यांना याचा फायदा होत आहे. पालेभाज्या, फळबागा, ऊससह शेतात नवनवीन प्रयोग राबविले जात आहेत.

शेतकर्‍यांना निरा नदी आणि डावा कालव्याद्वारे शेतीला पाणीपुरवठा होत आहे. डावा कालव्याला पाणी असल्याने विहिरींची पाणीपातळी टिकून राहण्यात मदत झाली आहे. तसेच छोटे उद्योगधंदे, मत्स्यपालन यांनाही याचा उपयोग होत आहे. फेब्रुवारी ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत कालवा पूर्णक्षमतेने सुरू राहणार आहे. त्यामुळे सध्यातरी शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.

 हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news