शिवनेरीवर प्लास्टिकबंदी; वन विभाग व पुरातत्व विभागाचा निर्णय | पुढारी

शिवनेरीवर प्लास्टिकबंदी; वन विभाग व पुरातत्व विभागाचा निर्णय

जुन्नर : पुढारी वृत्तसेवा : जागतिक वन दिनानिमित्त गुरुवार (दि. 21) पासून जुन्नर वन विभाग व पुरातत्व विभागाच्या वतीने किल्ले शिवनेरीवर प्लास्टिक बंदी घालण्यात आली आहे. किल्ले शिवनेरीवरील जैवविविधता अबाधित रहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक अमित भिसे यांनी सांगितले. किल्ले शिवनेरीवर येणार्‍या पर्यटकांना पाण्याची बाटली सोडून कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक, तंबाखू, गुटखा, माचीस, बिडी, सिगारेट घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. वाढत्या उन्हामुळे फक्त प्लास्टिकची पाण्याची बाटली किल्ल्यावर घेऊन जाण्याची परवानगी असेल, परंतु ती पाण्याची बाटली पुन्हा खाली येताना घेऊन येणे अनिवार्य करण्यात येत आहे.

तर 5 जूनपासून पुढे कायमस्वरूपी किल्ल्यावर प्लास्टिक पाण्याची बाटली देखील घेऊन जाण्यासाठी बंदी असेल. वन विभाग जुन्नर व पुरातत्व विभागामार्फत पर्यटकांसाठी फिल्टरचे पाणी पिण्यासाठी ठिकठिकाणी उपलब्ध असेल. किल्ले शिवनेरीवर पर्यावरण नावाची श्रीमंती भविष्यात जतन आणि संवर्धीत करण्यासाठी ठोस पावले वन विभागामार्फत उचलली जात आहेत. पर्यटकांनीही यासाठी भरभरून प्रतिसाद द्यावा तसेच तपासणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन जुन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी केले आहे.

हेही वाचा

Back to top button