

गजानन हगवणे
काटेवाडी: भारतीय टपाल खात्याने 1 सप्टेंबर 2025 पासून रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्याचा निर्णय घेऊन, ती थेट स्पीड पोस्टमध्ये विलीन केली जाणार आहे. टपाल विभागाच्या आधुनिकीकरण योजनेचा हा भाग असला तरी सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर ताण येणार आहे.
50 वर्षांहून अधिक काळ गावोगाव संवादाचे मुख्य साधन ठरलेली आणि सुख-दुःखाची साक्षीदार असलेली लाल टपालपेटी आता हळूहळू इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. डिजिटल युगातील पत्रव्यवहारातील घट, देखभाल खर्च व मनुष्यबळ यांचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. (Latest Pune News)
टपाल विभागाच्या सर्वेक्षणात अनेक ग्रामीण व शहरी टपालपेट्यांमध्ये दिवसाला एकही पत्र टाकले जात नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कमी वापराच्या टपालपेट्या टप्प्याटप्प्याने काढून टाकल्या जातील.
मात्र, टपाल कार्यालये, सरकारी कार्यालये व प्रमुख ठिकाणांवरील पेट्या अद्याप सुरू राहणार आहेत. आतापर्यंत रजिस्टर पत्रासाठी 26 ते 31 रुपये खर्च येत असे, मात्र आता तेच पत्र पाठवण्यासाठी स्पीड पोस्टच्या माध्यमातून किमान 41 रुपये मोजावे लागतील. त्यामुळे ग्राहकांना नाहक जादा खर्चाचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.
टपाल विभाग आता पारंपरिक पत्रव्यवहाराऐवजी पार्सल, लॉजिस्टिक्स, ई-कॉमर्स वितरण, बँकिंग सेवा व सरकारी योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. तथापि, या निर्णयाचा फटका ज्येष्ठ नागरिक व डिजिटल सेवा न वापरणार्या ग्राहकांना बसणार आहे.
रजिस्टर पत्राचा दर 26 रुपयांवरून थेट 41 रुपये करणे अन्यायकारक आहे. आता स्पीड पोस्टसाठी नाहक जादा खर्च सोसावा लागेल. या संदर्भात आम्ही टपाल खात्याला निवेदन देणार आहोत.
- बापूराव सोलनकर, ढेकळवाडी (ता. बारामती)