Baramati Accident: बसची दुचाकी अपघातात आजोबा ठार; नात गंभीर जखमी
बारामती: बारामती तालुक्यात अपघाती मृत्यूचे सत्र थांबायला तयार नाही. बारामती-निरा रस्त्यावर शारदानगर येथे शनिवारी (दि. 30) सकाळी एसटी बस व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात नातीला शाळेत सोडण्यासाठी आलेले ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र दिनकर भागवत (वय 59, रा. गोखळी, ता. फलटण, जि. सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची नात व प्रसिद्ध खेळाडू स्वरा योगेश भागवत ही गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बारामती-निरा रस्त्यावर शनिवारी (दि. 30) सकाळी शारदानगर येथे सकाळी पावणेसातच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. बारामती आगाराच्या बसने भागवत यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. त्यात पुढील चाकाखाली आल्याने राजेंद्र भागवत हे ठार झाले, तर स्वरा ही गंभीर जखमी झाली. (Latest Pune News)
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, भागवत हे नात स्वरा हिला शाळेला सोडविण्यासाठी गोखळीहून माळेगाव व तेथून शारदानगरकडे येत होते. ते शारदानगरला शाळेच्या बाजूला वळत असताना समोरून आलेल्या भरधाव बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात राजेंद्र यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. स्वरा ही अपघातात जखमी झाली असून तिच्यावर बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राजेंद्र भागवत हे गेली अनेक वर्षे फलटण तालुक्यात पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते. ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, नातवंडे असा परिवार आहे. ते योगेश भागवत, एपीआय रूपेश भागवत, पोलिस नीलेश भागवत यांचे वडील होत.
अपघातांचे सत्र सुरूच
गत महिन्यात डंपरने दिलेल्या धडकेत बारामतीत आचार्य कुटुंबातील दोन लेकींसह पित्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही बारामती शहर व तालुक्यात अपघातांचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले असून शासनाच्या विविध विभागांबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्वराचे खेळात अनेक विक्रम
अपघातात जखमी झालेल्या स्वरा हिने लहान वयातच खेळात अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. तिने सहाव्या वर्षी 12 तास सायकलिंग करत 143 किलोमीटर अंतर पार केले होते. याशिवाय तिने महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखर सर केले होते. खेलो इंडिया अंतर्गत सायकलिंगमध्ये तिने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. सध्या ती उपचार घेत आहे.

