

पुणे : अरबी समुद्रात गुरुवारी दुपारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. शुक्रवारी सायंकाळी त्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात होत आहे. ही प्रक्रिया आगामी 36 तास सुरू राहणार आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्राला शुक्रवारी रेड, तर शनिवार ते सोमवारपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, चक्रीवादळाची शक्यता सध्या दिसत नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
दक्षिण कोकण ते गोवा किनार्यापासून पूर्व-मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र गुरुवारी दुपारी तयार झाले. ते उत्तरेकडे सरकत शुक्रवारी 23 मे रोजी संध्याकाळी पश्चिम किनारपट्टीकडे सरकत आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस गुजरात, कोकण आणि गोवा, कर्नाटक आणि केरळ किनारपट्टीला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हा पाऊस सहा ते सात दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 23 रोजी रेड तर 28 मेपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यात म्हटले आहे की, 22 ते 24 मेदरम्यान कोकण किनारपट्टीसह गोवा राज्यात अतिमुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. आगामी दोन ते तीन दिवसांत केरळमध्ये मान्सूनचे आगमन होणार आहे. त्यामुळे हा पाऊस आणखी सात दिवस वाढण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात चक्रीवादळाची तयारी सुरू झाल्याचे उपग्रहाने दिलेले चित्र व्हायरल होताच मुंबईच्या मंत्रालयातून जनतेच्या मोबाईलवर मुसळधार पावसाचे अलर्ट सुरू झाले. उद्या चक्रीवादळ धडकणार असल्याने कोकण किनारपट्टीसह बहुतांश ठिकाणी रेड अलर्ट दिल्याचे मेसेज मोबाईलवर येत होते.
रेड (अतिवृष्टी 100 ते 200 मि.मी.) : रायगड (23 मे) रत्नागिरी (23 मे)
ऑरेंज अलर्ट (मुसळधार : 60 ते 99 मि. मी.) : पालघर (23,24), ठाणे (23,24), मुंबई (23, 24), रायगड (23, 24), रत्नागिरी (24 ते 26), सिंधुदुर्ग (23 ते 26), नाशिक (23), अहिल्यानगर (23), पुणे (23), पुणे घाट (23.24), कोल्हापूर घाट (23,24), सातारा घाट (23 ते 25 ), छत्रपती संभाजीनगर (23), अकोला (24), बुलडाणा (24).
यलो अलर्ट (मध्यमः 20 ते 49 मि.मी.) : पालघर (25), ठाणे (25), मुंबई (25), रत्नागिरी (25), धुळे (25), धुळे (23 ते 26), नंदुरबार (23 ते 25), जळगाव (23 ते 26), नाशिक (24,25), अहिल्यानगर (24,25), कोल्हापूर (23,24), सातारा (25), सांगली (23), छत्रपती संभाजीनगर (24, 25).