

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेतील पदभरतीमध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाच्या रिक्त जागांसाठी प्रतीक्षायादीतील उमेदवारांची नियुक्ती त्वरित करावी, अशी सूचना महापालिका आयुक्तांनी प्रशासनाला केली आहे. महापालिकेने 2022 मध्ये लिपिक, सहायक अतिक्रमण निरीक्षक, कनिष्ठ अभियंता या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. त्यामध्ये 135 कनिष्ठ अभियंत्यांच्या (स्थापत्य) जागेसाठी 12 हजार 702 जणांनी अर्ज आले होते. ऑनलाइन परीक्षेत सर्वाधिक गुण घेणार्या सुमारे 450 जणांना कागदपत्र
पडताळणीसाठी बोलविण्यात आले होते. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर त्यातून 135 उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर केली. प्रतीक्षायादीही तयार केलेली आहे. अंतिम निवड यादीतील काही उमेदवारांनी नोकरी स्वीकारलेली नाही, तर काहींनी अनुभवाचे खोटे दाखले दिल्याने त्यांना नोकरीतून बडतर्फ केले आहे. सुमारे 13 जागा रिक्त आहेत.
महापालिका प्रशासनाने लिपिक व सहायक अतिक्रमण निरीक्षक या पदाच्या रिक्त जागांवर प्रतीक्षायादीतील उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश गेल्या महिन्यात काढले. पण, कनिष्ठ अभियंतापदाचा प्रस्ताव प्रलंबित असल्याने या उमेदवारांमध्ये अस्वस्थता आहे. याबाबत आयुक्त विक्रम कुमार यांना विचारले असता ते म्हणाले, 'प्रतीक्षायादीतील उमेदवारांची नियुक्ती केली केली जाणार असून, ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याची सूचना केली आहे.'
महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमावलीत कनिष्ठ अभियंतापदासह अन्य काही पदांसाठी अनुभव अनिवार्य आहे. पण, उमेदवारांचा अनुभव खरा की खोटा, हे तपासणे प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे अनुभवाची अट रद्द करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठवला आहे. अद्याप त्यावर शासनाने निर्णय घेतलेला नाही. आयुक्त कुमार म्हणाले, 'अनुभवाची अट रद्द झाल्याबाबत अद्याप शासनाकडून कळविण्यात आलेले नाही. हा निर्णय झाल्यानंतर कनिष्ठ अभियंतापदाच्या सुमारे 125 जागांची भरती सुरू केली जाईल.'
हेही वाचा