

Pune News: राज्यातील 55 हजार रास्त भाव धान्य दुकानदारांनी 1 नोव्हेंबरपासून बंदची घोषणा केली आहे. नफ्यात 300 रुपये प्रतिक्विंटल वाढ करण्याच्या मुख्य मागणीसाठी वितरण बंद ठेवण्याचा इशारा अखिल महाराष्ट्र रेशन दुकानदार महासंंघ व ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकीपर फेडरेशनने घेतला आहे. यामुळे दिवाळीच्या तोंडावर गोरगरिबांचे हाल होण्याची चिन्हे आहेत.
राज्य सरकारने 2018 पासून आजवर दरवर्षी महागाईच्या निर्देशांकानुसार दुकानदारांना मिळणार्या नफ्यामध्ये वाढ केलेली नाही. तसेच धान्यवितरणामध्ये येणार्या अडीअडचणी व समस्या सोडविण्यासाठी कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही व त्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेतला जात नाही.
रास्त भाव धान्य दुकानदारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात विविध मोर्चे, उपोषणे आणि आंदोलनाच्या माध्यमातून आत्तापर्यंत राज्य आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधले. अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून नफावाढीचा प्रस्ताव वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता.
प्रमुख मागण्या
प्रतिक्विंटल 300 रुपयांनी नफ्यात वाढ करावी
'आनंदाचा शिधा' या संचाच्या विक्रीसाठी पंधरा रुपयांचा नफा देण्यात यावा
व्यावसायिक दराने वीजपुरवठा न करता तो घरगुती दराने द्यावा
मालमत्ताकरामध्ये सवलत मिळावी
मागण्या मान्य न केल्याने हा संप करावा लागणार आहे.
- गणेश डांगी, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र रेशन दुकानदार संघटना महासंघ, पुणे