नितीन पवार
Diwali News 2024: दिवाळीसाठी विविध आकारातील आकर्षक पणत्यांनी कसबा पेठेतील कुंभारवाडा सध्या सजला आहे. गुजरात (खानवड), पश्चिम बंगाल (कोलकत्ता) आणि राजस्थानमधून या पणत्या या ठिकाणी विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. तसेच, पणत्यांच्या रंगकामासाठी लागणारे रंग 10 ते 15 शेडमध्ये विक्रीसाठी कुभांरवाड्यात उपलब्ध असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
कुंभारवाड्यातील लाल मातीपासून बनविण्यात आलेल्या पणत्यांना विशेष मागणी आहे. पीओपी आणि चिनी मातीपासून बनविलेल्या मंदिर, नारळ आणि झोपड्डी आकारातील पणत्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच, मोर, दीपमाळ, मेण असलेली पणती, कटिंग पणती, मडकी पणती, काचेची दिवे असलेली पणती, एकवीस दिवा थाळी, मातीचे आकशकंदील, अखंड दिवे, कासव दिवा आणि आकशकंदील कुंभारवाड्यात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लाल मातीच्या पणत्यांच्या भावात 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच, रंग महाग झाल्याने व पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने किल्ले, शिवाजी महाराजांचे पुतळे, चित्रे आणि लक्ष्मीमातेच्या मूर्तींचे भाव वाढले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
कसबा पेठेतील कुंभारवाडा आणि केशवनगर, मुंढवा येथे होलसेल बाजारात पणत्यांसह दिवाळीसाठी लागणारे साहित्य विकत मिळत आहेत. या ठिकाणी कोकण, मुंबई, नागपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील किरकोळ विक्रेत्यांसह शहर आणि उपनगरांतील विक्रेते आणि ग्राहकांची खरेदीसाठी सध्या गर्दी होत आहे.
पणत्यांचे भाव
साध्या पणत्या : 30
डिझाइन पणत्या : 40 ते 50 डझन
मोर पणती : 60 नग
दीपमाळ : 150 ते 200 नग
कंदिल पणती : 120 नग
हत्ती पणती : 70 लहान नग
हत्ती पणती : 120 मोठा नग
नारळ पणती : 40 नग
मंदिर पणती : 60 नग
मेणाचे मडके (लहान) : 72 डझन
मेणाचे मडके (मोठे) : 120 डझन
कासव दिवा : 50 रुपयांपासून नग
यंदा पावसामुळे तंदूर माती भट्टीचे नुकसान झाले आहे. तसेच, वाहतुकीचा खर्च वाढल्याने लाल मातीच्या पणत्यांच्या भावात वाढ झाली आहे. 30 रुपये डझन, दीडशे रुपये शेकडा आणि 1400 रुपयांना हजार पणत्या मिळत आहेत. पीओपी आणि चिनी मातीपासून बनविलेल्या पणत्यांचे भाव स्थिर आहेत.
- नवनाथ शिर्के, विक्रेते, कुंभारवाडा, कसबा पेठ.