सांगली : पृथ्वीराज पाटील यांनी पक्षाशी निष्ठा ठेेवून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष या नात्याने सांगली मतदारसंघात काँग्रेस बळकट करण्यासाठी भरीव योगदान दिले. रस्त्यावर उतरून आंदोलने केली. अनेक उपक्रम राबवले. असे असतानाही यावेळी त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळणार नाही, असे वातावरण जाणीवपूर्वक तयार केले जात आहे. हे चालणार नाही. त्यांना अपक्ष लढवू, प्रसंगी लोकसभेचा सांगली पॅटर्न राबवू; पण पृथ्वीराज पाटील यांनाच आमदार करू, असा निर्धार निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला.
काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची मंगळवारी एकच गर्दी झाली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. बिपिन कदम, नेमिनाथ बिरनाळे, महावीर पाटील, रवींद्र वळवडे, दिनकर साळुंखे, किरण सूर्यवंशी, अरविंद पाटील, रामभाऊ पाटील, गौतम कांबळे यांनी रोखठोक भूमिका मांडली.
2019 मध्ये पृथ्वीराज पाटील यांनी निवडणूक लढवली. फक्त तीन टक्के मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला; पण लगेच दुसर्या दिवसापासून ते पुन्हा कामाला लागले. मतदारांशी त्यांनी कधीच प्रतारणा केली नाही. या दहा वर्षांत 300 पेक्षा जास्त आंदोलने केली. स्थानिक प्रश्नांची तड लावण्यासाठी रस्त्यावर उतरून लढे दिले. शासन दरबारी पाठपुरावे केले. या सार्या कामांमुळे आणि पक्षाशी ठेवलेल्या निष्ठेमुळे पक्षश्रेष्ठींचाही त्यांच्यावर विश्वास आहे. सांगली आमदारकीची निवडणूक लढवायचा अधिकार फक्त आणि फक्त पृथ्वीराज पाटील यांनाच आहे, असे सांगून आमदार डॉ. विश्वजित कदम पाटील यांना उमेदवारी मिळवून देतील. सांगली विधानसभेची उमेदवारी पृथ्वीराज पाटील यांनाच मिळायला हवी, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. खासदार विशाल पाटील यांचीही ताकद पृथ्वीराज पाटील यांना मिळेल, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
मुळातच 2019 मध्ये पृथ्वीराज पाटील यांना उशिरा उमेदवारी मिळाली. मतदारांशी संवाद साधायला आणि पक्षाची भूमिका मांडायला पुरेसा वेळ त्यांना तेव्हा मिळाला नाही, तरीही त्यांना 87 हजार मते मिळाली. याचा अर्थ सांगली मतदारसंघातील सुजाण नागरिकांचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. आजही मतदारांना तेच आमदार म्हणून हवे आहेत, मग ही संभ्रमावस्था तयार करण्याचे कारण काय, असा सवाल कार्यकर्त्यांनी केला.
सांगली शहर जिल्हाध्यक्ष या नात्याने सांगली मतदारसंघात काँग्रेस बळकट करण्यासाठी भरीव योगदान देणार्या, तीनशेहूनही जास्त आंदोलने करून प्रश्न तडीला लावणार्या, अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवणार्या, मंत्रालयापर्यंत प्रश्नांचा पाठपुरावा करणार्या, शैक्षणिक-सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या पृथ्वीराज पाटील यांच्याशिवाय दुसरा समर्थ उमेदवार कोण आहे, असा सवाल कार्यकर्त्यांनी केला.
यावेळी गौस नदाफ, विश्वास माने, महावीर पाटील, शशिकांत शिंदे, अजित भाई मिस्त्री, सलमान मिस्तरी, अजीम शेख, ताजुद्दीन शेख, मोहसीन मिस्त्री, किरण सूर्यवंशी, रवींद्र वळिवडे, आलताफ पेंढारी, दिलीप पाटील, ए. डी. पाटील, विक्रम भैया कदम, संजय साळुंखे, अजय देशमुख, बिपिन कदम, सुनील धोत्रे, संभाजी पोळ, अजिज शेख, प्रीतम रेवणकर, प्रफ्फुल यादव, रघुनाथ नार्वेकर, गुरुप्रसाद चौगुले, वसीम आमीन, युवराज पाटील, सूरज मगदूम, सुशांत गवळी, शीतल सदलगे, विजय आवळे, विक्रम कांबळे, नाना घोरपडे, जितू हेगडे, भारती भगत, अजिंक्य मोहिते, रमेश पाटील, गौस नदाफ, संतोष भोसले, विजय पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
दहा वर्षांत विद्यमान आमदारांनी एकही प्रश्न मार्गी लावलेला नाही. नुसताच निधी आणल्याच्या घोषणा ते करताना दिसतात. विकास शून्यच आहे. महिला सुरक्षित नाहीत. महागाई, बेरोजगारी वाढ झाली आहे. या परिस्थितीत भाजपचा पाडाव करून सांगलीचा विकास साधण्यासाठी पृथ्वीराज पाटील यांच्यासारखा दूरद़ृष्टीचा आणि विकासाचे व्हिजन असलेला नेताच हवा, असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
काँग्रेस नेते आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. पृथ्वीराज पाटील यांची निष्ठा, कामाची पद्धत, पक्षासाठी दिलेले योगदान त्यांना माहिती आहे. ते पाटील यांना उमेदवारी मिळवून देतील, अशी खात्री कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. तथापि, तसा निर्णय न झाल्यास जनसामान्यांच्या भावनांची कदर करत पृथ्वीराज पाटील अपक्ष लढतील आणि निवडून आल्यानंतर ते आमदार कदम आणि काँग्रेस पक्षाचेच असतील, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.