पुणे : मगरपट्टा, साधना सोसायटीत राष्ट्रवादीचेच आव्हान
प्रमोद गिरी
हडपसर : प्रभाग क्रमांक 22 हा पूर्वीचा भाग होता. आता नव्याने प्रभाग क्रमांक 24 असून, या प्रभागाचे नाव मगरपट्टा-साधना सोसायटी असे आहे. या प्रभागात शिंदे वस्ती, भोरी पडळ लोहिया उद्यान हा नव्याने थोडासा भाग जोडला आहे. या प्रभागात राष्ट्रवादी पक्षाचे प्राबल्य आहे. यामुळे प्रभागात आघाडी होईल का? की स्वतंत्र पक्षाचे उमेदवार लढतील की बंडखोरी करतील हे पाहावे लागेल. मात्र काही झाले तरी राष्ट्रवादी पक्षाची ताकद या प्रभागात मोठी आहे.
चारही नगरसेवक राष्ट्रवादीचे
पूर्वीच्या 22 प्रभागातून चारही नगरसेवक राष्ट्रवादी पक्षाचे निवडून आले होते. या नव्या प्रभागात परत तिन्ही उमेदवार निवडून येतील का, हे पाहावे लागेल. कारण या प्रभागात आमदारांचे वास्तव्य आहे. यामध्ये नव्याने असलेला प्रभाग क्रमांक 24 असून मगरपट्टा – साधना सोसायटी या प्रभागातील व्याप्ती मतदार लोकसंख्या 56,446 इतकी आहे. प्रभागात प्रामुख्याने जोडलेला भाग यात नव्याने लोहिया उद्यान, शिंदे वस्ती, भोरी पडळ, मगरपट्टा, साधना सोसायटी, हडपसर इंडस्ट्रिअल एरिया, शिंदे वस्ती, कड वस्ती, हडपसर, नोबल हॉस्पिटल, आनंदनगर, माळवाडी, भागीरथीनगर, भोसलेनगर, कॉसमॉस पार्क, रॉयल स्टोनिया सोसायटी, सीजन्स मॉल, कीर्तने बाग पार्ट, सोमनाथनगर, सायबर सिटी, भीमनगर कॉलनी, दळवीनगर, टिळेकर वस्ती, अनथम सोसायटी आदी परिसर येतो.
आघाडीहोणार की नाही यावर चित्र अवलंबून
या प्रभागामध्ये राष्ट्रवादी पक्षातून इशान चेतन तुपे, नीलेश मगर, हेमलता मगर, प्रवीण तुपे, दत्तात्रय तुपे, प्रदीप मगर, बंडूतात्या गायकवाड, कुमार तुपे आदी, तर काँग्रेसमधून प्रशांतमामा तुपे, ऊर्मिला नितीन आरू, शहाजी मगर, बाळासाहेब गोंधळे हे इच्छुक आहेत. शिवसेनेतून समीरअण्णा तुपे, गीतांजली काळूराम आरू, अॅड. मनीष मगर, तर भाजपामधून अविनाश मगर, रवी तुपे, संतोष शिंदे हे इच्छुक आहेत. अपक्ष इंद्रजित दिलीपआबा तुपे हेपण इच्छुक आहेत. पक्षाने तिकीट नाकारले किंवा आघाडी न झाल्यास हेच इच्छुक ज्या पक्षात तिकीट मिळेल तेथे प्रवेश करून पालिकेत निवडून जाण्यासाठी प्रयत्न करतील, तर नाराज गट आघाडी करण्यासाठी इच्छुक असेल असे
चित्र आहे. या प्रभागात कचरा, पाणी प्रश्न व वाहतूक समस्या आहे. नव्या उमेदवारांना संधी मिळेल की अनुभवी लोकप्रतिनिधींना पालिकेत जाण्याची संधी मिळेल हे प्रभागातील मतदार ठरवतील याकडे लक्ष लागले आहे. ओबीसी आरक्षण कसे पडेल यावर पालिकेच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळेल.
परराज्यातून आलेल्यांची संख्या मोठी
मगरपट्टा टाउनशिप परिसरात प्रामुख्याने परराज्यातून आलेला वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. कीर्तने बाग, लोहियानगर, माळवाडी व नव्याने समाविष्ट झालेल्या शिंदे वस्ती, कड वस्ती, मिरेकरी वस्तीमध्ये कष्टकरी मागसवर्गीय समाज मोठ्या प्रमाणात राहतो आहे, तर या प्रभागात नव्याने समाविष्ट झालेला लोहिया उद्यान भोरी पडळचा संमिश्र विचारधारेचा समावेश झाला आहे. पुढे पारिजात व साधना सोसायटीचा परिसर असून या ठिकाणी मराठा, माळी व इतर समाजाचे नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत.
लोकसंख्या : 56 हजार 446
अनुसूचित जाती : 4952
अनुसूचित जमाती : 640

