कोरेगाव पार्क : आदिवासी संस्कृतीचा दुर्मीळ ठेवा

कोरेगाव पार्क : आदिवासी संस्कृतीचा दुर्मीळ ठेवा

कोरेगाव पार्क(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेतील संग्रहालयात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणार्‍या मौल्यवान व दुर्मीळ वस्तूंचा संग्रह आहे. राज्यातील विविध भागांतून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणार्‍या 1350 वस्तू या संग्रहालयात प्रदर्शित केल्या आहे. हे संग्रहालय येत्या 15 ऑगस्टपर्यंत सर्वांसाठी मोफत खुल्ले आहे. या संग्रहालयाचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. सांस्कृतिक अधिकारी विजय डगळे यांनी सांगितले, 'या संग्रहालयाचे प्रमुख चार विभाग आहेत. पहिल्या दालनात अठरा आदिवासी जमातींची विविध छायाचित्रे प्रदर्शित केली आहेत.

या जमातींची भौगोलिकदृष्ट्या कोकण, मराठवाडा, गोंडवना, सातपुडा अशा चार विभागांत विभागणी केली आहे. आदिवासी जीवनातील सांस्कृतिक वैशिष्ट्ये यातून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच आदिवासी जीवनावरील लघुपट दाखविण्याची व्यवस्थाही या ठिकाणी केली आहे. आदिवासींच्या भौतिक संस्कृती विभागात आदिवासींची विविध संगीत वाद्य, घरगुती वापराची उपकरणे, शिकारीची साधने, शेती अवजारे, लग्नप्रसंगी वापरण्यात येणार्‍या वस्तू, तसेच आजच्या काळात आदिवासींनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तू या संग्रहालयात आहेत. वारली चित्रकलेचे उत्कृष्ट नमुनेदेखील या ठिकाणी असल्याचे डगळे यांनी सांगितले.

उपक्रमास नागरिकांचा प्रतिसाद

आदिवासी देवतांच्या विविध प्रतिमा, मूर्ती संग्रहालयात जतन करून ठेवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे वारली जमातीत लग्नासाठी शेणा-मातीने लिपलेल्या कारवीच्या भिंतीवर तांदूळ पिठाने काढलेला 'लग्नचौक' हा देखील चित्रकलेचा उत्तम नमुना असून, हे संग्रहालय पाहण्यासाठी नागरिकांची सध्या गर्दी होत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news