

शिरूर: रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोनेसांगवी परिसरात सराईत गुन्हेगाराचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांना ‘ठोक ठोक’ असे म्हणत पोलिस पथकावर दोघा सराइतांनी गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी देखील स्वसंरक्षणासाठी आरोपींवर गोळीबार केला; परंतु आरोपी उसाच्या शेताचा फायदा घेऊन फरार झाले. ही घटना शनिवारी (दि. 16) सायंकाळच्या सुमारास घडली. रात्री उशिरापर्यंत पोलिस पथके आरोपींचा या भागामध्ये शोध घेत होते.
याप्रकरणी गोरक्षनाथ बाळासाहेब बालवडकर (वय 40, सहायक पोलिस निरीक्षक, मालमत्ता गुन्हेविरोधी पथक पुणे शाखा पिंपरी-चिंचवड आयुक्तालय) यांनी फिर्याद दिली आहे. शेखर संभाजी जाधव (रा. शिक्रापूर, ता. शिरूर) व त्याचा एक अनोळखी साथीदार याच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता चऱ्होली येथील गोळीबार गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार शेखर जाधव व त्याच्या साथीदारांचा रांजणगाव परिसरात गुन्हे शोध पथक शोध घेत होते. या वेळी शेखर जाधव व त्याचा साथीदार हे मोटरसायकल (एमएच 12 डब्ल्यूबी 5185)ने मलठण रस्त्याने जात होते. गुन्हे शोध पथक त्यांचा पाठलाग करत असताना त्यांनी मोटरसायकल रोडच्या कडेला सोडून शेतामध्ये पळ काढला.
या वेळी शेखर जाधव याने त्याच्या साथीदारास ’पोलिसांना ठोक ठोक’ असे म्हटल्यावर त्याच्या साथीदाराने पोलिसांच्या दिशेने पिस्टलमधून दोन राउंड फायर केले. या वेळी पोलिसांनी देखील स्वसंरक्षणाकरिता शासकीय पिस्तुलातून आरोपींच्या दिशेने चार राऊंड फायर केले. दरम्यान, शेखर जाधव आणि त्याचा साथीदार उसाच्या शेतातून पसार झाले. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाणे येथे गोळीबार करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण व सरकारी कामात अडथळा आणणे आदींसह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या गोळीबाराची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिस पथक, शिरूर पोलिस ठाण्याचे पथक तसेच पिंपरी-चिंचवड, भोसरी परिसरातील पोलिस पथक यांनी घटनास्थळी धाव घेऊन रांजणगाव परिसरातील वाघाळे, निमगाव भोगी व परिसरात आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. संशयित शेखर जाधव याच्याविरोधात भोसरी, दिघी (पुणे) परिसरात चोरी, जीवघेणा हल्ला, लुटमार करणे, घरफोडी यासह गंभीर गुन्हे दाखल आहेत.