

पुणे: महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने काही महिन्यांपूर्वी नाट्यगृहांच्या तारखांच्या बुकिंगसाठी रंगयात्रा ॲप सुरू केले आहे. पण, या ॲपमधील तांत्रिक अडचणींचा फटका नाट्यनिर्माते, व्यवस्थापक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजकांना बसत आहे. त्यामुळे ॲपमधील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पुणे आणि मुंबईमधील नाट्य निर्माते, व्यवस्थापक यांची संयुक्त बैठक लवकरच सांस्कृतिक विभागामार्फत बोलविण्यात येणार असून, त्या बैठकीत ॲपमधील अडचणींबाबत चर्चा होऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (Latest Pune News)
रंगयात्रा ॲपमधील अडचणींविषयी चर्चा करण्यासाठी गुरुवारी (दि. 6) महापालिकेच्या सांस्कृतिक विभागातील अधिकाऱ्यांची नाट्यनिर्माते, नाट्यव्यवस्थापकांसोबत बैठक झाली. त्यात पुणे आणि मुंबईतील नाट्यनिर्माते, व्यवस्थापकांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे, महापालिकेच्या नाट्यगृह विभागाचे मुख्य व्यवस्थापक राजेश कामठे यांच्यासह नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, नाट्यव्यवस्थापक मोहन कुलकर्णी, समीर हंपी, सत्यजित धांडेकर, शिरीष कुलकर्णी, शशिकांत कोठावळे उपस्थित होते. नाट्यनिर्माते आणि व्यवस्थापकांनी ॲपला विरोध दर्शवित या ॲपबाबतच्या अडचणी मांडल्या आणि त्याबाबतचे निवेदन मराठी नाट्य व्यवस्थापक संघाकडून या वेळी देण्यात आले.
याविषयी महापालिकेच्या नाट्यगृह विभागाचे मुख्य व्यवस्थापक राजेश कामठे म्हणाले, नाट्यगृहांच्या तारखांच्या बुकिंगसाठी रंगयात्रा ॲप सुरू केले आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. पण, त्यात तांत्रिक अडचणी येत असल्याचे पुणे आणि मुंबईतील नाट्यनिर्माते, व्यवस्थापकांचे म्हणणे आहे. या अडचणींवर चर्चा करण्यासाठी लवकरच संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
आमचा ऑनलाइन प्रक्रियेला विरोध नाही. पण, तारखांच्या बुकिंगबाबत होणारा गोंधळ दूर झाला पाहिजे. तसेच, त्यातील तांत्रिक अडचणी दूर झाल्या पाहिजेत, अशी आमची मागणी आहे. अडचणींबाबतचे लेखी निवेदन सांस्कृतिक विभागाला देणार आहोत.
मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, नाट्य परिषद पुणे शाखा
रंगयात्रा ॲपद्वारे तारखांसाठी बुकिंग करताना अनेक अडचणी येत आहेत. नाटकांऐवजी काहीवेळा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना तारखा देण्याचे प्रकार घडत आहेत. तारखांचे वाटप करताना नाटकांना प्राधान्य द्यावे, या आणि अशा विविध मागण्या आम्ही बैठकीत केल्या आहेत. मुंबईच्या नाट्यनिर्माते, व्यवस्थापकांचे नाट्यप्रयोगही पुण्यात मोठ्या संख्येने होत असल्याने त्यांनाही बुकिंगसंदर्भात अनेक अडचणी येत असून, त्यामुळे संयुक्त बैठक घेण्यात यावी, अशी विनंती आम्ही केली.
सुनील महाजन, अध्यक्ष, संवाद पुणे