

खडकवासला: पानशेतजवळील कुरण बुद्रुकमध्ये छत्तीसगड राज्यातील आदिवासी भागातील लोहडी, समुंदचिनी या पौष्टिक व सुगंधी भातपिकांसह फुले कोलम जातीची भातपिके बहरली आहेत. कमी क्षेत्रात अधिक उत्पन्नासह इतर तांदळापेक्षा अधिक बाजारभाव या पिकांना आहे. (Latest Pune News)
राजगड तालुका कृषी अधिकारी सुनील इडोळे पाटील म्हणाले, फुले कोलम ही भाताची जात वडगाव मावळ ( ता. मावळ) येथील शासकीय भात संशोधन केंद्राने विकसित केली आहे. 140 दिवसांत हे पीक कापणीस येथे. फुले कोलम हा तांदूळ येथे अत्यंत चवदार आहे. समुंदचीनी व लोहाड या देशी भाताच्या जाती आहेत. छत्तीसगडच्या आदिवासी भागात याची लागवड होते. छत्तीसगडसारखे हवामान व पाऊस राजगड, मुठा सिंहगडच्या डोंगरी पट्ट्यात असल्याने या भागात या जातीची भात पिके जोमदार वाढली.
समुंदचिनी हे भात पीक 150 दिवसांत कापणीस येते. याचा तांदूळ आकाराने छोटा आहे. मात्र, खाण्यास चवदार व पौष्टिक आहे. हा तांदूळ सुगंधित आहे, तर लोहडी हा 140 दिवसांत कापणीस येतो. भाताचे दाणे रंगाने काळपट आहे. मात्र, तांदूळ लोहयुक्त आहे. कुरण बुद्रुक येथील शेतकरी बाबासाहेब रायकर व मयूर रायकर यांनी एक एकर क्षेत्रात यंदाच्या हंगामात या तिन्ही जातीच्या भातपिकांची लागवड केली आहे. रायकर यांना नितीन ढमाळ, अविनाश राठोड, शशी गवळे यांनी मार्गदर्शन केले.
येत्या दहा-पंधरा दिवसांत तिन्ही जातीच्या भातपिकांची कापणी करण्यात येणार आहे. इतर जातींच्या तांदळापेक्षा या देशी जातींचा तांदूळ पौष्टिक व आरोग्यवर्धक आहे. त्यामुळे या तांदळाला शंभर ते दीडशे रुपये प्रतिकिलो दर मिळतो.
नितीन ढमाळ, मंडल कृषी अधिकारी, पानशेत विभाग