कोंढवा: खड्डेमय व अरुंद रस्त्यांमुळे परिसरातील संपूर्ण रस्ते वाहतूक कोंडीच्या गर्तेत सापडले असून, याचा फटका सध्या वाहनचालकांसह पादचाऱ्यांना बसत आहे. वैतागलेले लोक कोंडी सोडविणाऱ्या पोलिसांवर कोंडीचे खापर फोडत आहेत. महापालिका मात्र नामानिराळी राहत आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पालिका प्रशासनानेच ठोस पावले उचलण्याची गरज आहे. (Latest Pune News)
कोंढवा, वानवडी, पिसोळी, उंड्री, महंमदवाडी परिसरात दररोज सायंकाळी सहानंतर वाहतूक कोंडीचे प्रकार घडत आहेत. दहा-वीस मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी लोकांना तासन् तास वाहतूक कोंडीत घालवावे लागत आहेत. मुख्य रस्ता असो अथवा पोटरस्ते, सर्व रस्त्यांची चाळण झाली असून, वाढती वाहनांची संख्या, खड्डेमय व अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीत मोठी वाढ झालेली आहे. ही कोंडी फोडताना वाहतूक पोलिसांना चौकाचौकांत तारेवरची कसरत करावी लागत आहे.
वाहतूक कोंडी ही खड्डेमय रस्त्यांमुळे होतेय, ही बाब लोकांना माहीत असताना देखील उगाचच वाहतूक पोलिसांवर प्रश्नांचा भडिमार करताहेत. सिग्नल असायला हवा, चौकात जास्त पोलिस का नाहीत, दररोज याच ठिकाणी वाहतूक कोंडी का होते; मग रस्त्याच्या बाजूचे अतिक्रमण का काढले जात नाही. हे बोलणे पोलिसांना ऐकावे लागत आहे. काम महापालिकेचे आणि खापर मात्र वाहतूक पोलिसांवर फुटत आहे.
पालिकेकडून नव्या रस्त्यांची अपेक्षा लोकांना नाही. मात्र, पडलेल्या खड्ड्यांची तरी डागडुजी करायला हवी. तासन् तास कोंडीत सापडल्यामुळे वाहनांना इंधन जास्तीचे जात आहे. प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. शहरातील वाहतूक कोंडी व वाहतुकीला गती देण्यासाठी महापालिका प्रशासनानेच ठोस पावले उचलण्याची गरज आहे.