Pune Politics: शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातील इतर उमेदवारांपेक्षा पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांना सर्वाधिक मताधिक्य देऊन विजयी करण्याचा निर्धार विविध पक्ष संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.
बागवे यांच्या प्रचारार्थ आंबेडकरी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी माजी आमदार जयदेव गायकवाड यांनी जातीयवादी शक्तीला पराभूत करण्यासाठी बागवे यांना निवडून देण्याचे आवाहन केले. तर उमेदवार निवडून आणणे, भाजपाचा पराभव करणे हाच आमचा प्राधान्यक्रम असल्याचे माजी नगरसेवक अविनाश साळवे यांनी सांगितले.
आंबेडकरी जनतेचे जीवनमान उंचावणे व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाद्वारे दिलेले अधिकारांचे संरक्षण करणे हे माझे जीवनध्येय आहे, असे बागवे यांनी याप्रसंगी सांगितले. तर बागवे यांचा विजय हा आंबेडकरी चळवळीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने कोणत्याही प्रकारची मतविभागणी न करता त्यांच्या विजयासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी दिली.
या वेळी सचिन खरात, चंद्रशेखर जावळे, अशोक जगताप, मिलिंद अहिरे, अनिल हतागळे, माजी नगरसेवक अविनाश बागवे, आनंद कांबळे, दीपक ओव्हाळ, विठ्ठल गायकवाड, अक्षय कांबळे आदी उपस्थित होते.