

कोरेगाव : तालुक्याला आपला हक्काचा खासदार मिळेल, अशी परिस्थिती असताना या मतदारसंघातील विद्यमान आमदाराने द्वेषाचे राजकारण करून येथील मतदारांचा स्वाभिमान दुखावला व तालुक्याला वंचित ठेवले. ही खंत मनात ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपला हक्काचा आमदार निवडून आणण्यासाठी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात कंबर कसली आहे. त्याला जनतेने साथ द्यावी, असे आवाहन महाविकास आघाडीचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांनी केले.
कोरेगाव मतदारसंघातील अंबवडे सं. वाघोली, पुसेगाव, चंचळी, घाडगेवाडी, एकंबे, कोडोली, खेड, खावली, क्षेत्रमाहुली, संगममाहुली, सोनगाव सं. निंब, न्हाळेवाडी, आरफळ, एकसळ चिलेवाडी, हासेवाडी, बोधेवाडी, चिमणगाव, कवडेवाडी, हिवरे, कटापूर, नांदगिरी, शेंदूरजणे, पुसेगाव, बुध, डिस्कळ या गावात आ. शशिकांत शिंदे यांनी गावभेट दौर्यात मतदारांशी संवाद साधला.
यावेळी आ. शशिकांत शिंदे म्हणाले, कोरेगाव मतदारसंघाची लढाई स्वाभिमानाची आहे. येथील मतदारांनी गद्दारांना गाडून निष्ठावंत शिलेदाराच्या पाठीशी उभे राहण्याचा घेतलेला निर्णय हीच माझ्यावरील प्रेमाची पोहोच पावती आहे. येथील आमदारांची हुकुमशाही, फोडाफोडी, दमबाजी, बेशिस्त वर्तन, शरदचंद्र पवार यांच्यावर केलेली जहरी टिका यामुळे मतदारांमध्ये चीड निर्माण झाली आहे. युवकांना व्यसनाला लावून तरूण पिढी बरबाद करण्याचा उद्योग त्यांनी सुरू केला आहे. त्यामुळे मतदारांनी ही निवडणूक हातात घेतली असल्याचे आ. शशिकांत शिंदे म्हणाले.
सुडाचे राजकारण करत विकासाच्या नावाखाली स्वतःची कंत्राटदारी टिकवण्यासाठी त्यांची चाललेली धडपड उघड करण्याचा मतदारांनी विडा उचलला आहे. जनतेशी बेईमानी करणार्यांना मतदार यावेळी धडा शिकवतील, असा विश्वास आ. शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.