भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत, आस्थेने अयोध्येला निघाले रामभक्त

भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत, आस्थेने अयोध्येला निघाले रामभक्त

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे रेल्वे स्टेशनवर जय श्री राम… जय जय श्री रामचा जयघोष… डोक्यावर भगवी टोपी… गळ्यामध्ये आस्था विशेष रेल्वेचे ओळखपत्र… संयोजकांच्या सूचनांचे पालन करणारे रामभक्त हळूहळू रेल्वेमध्ये आसनस्थ झाले… श्री रामाच्या दर्शनाच्या ओढीने निघालेल्या प्रवाशांना घेऊन आस्था रेल्वे संध्याकाळी 7 वाजून 25 मिनिटांनी अयोध्येच्या दिशेने मार्गस्थ झाली. पुण्यातून आस्था विशेष रेल्वे मंगळवारी संध्याकाळी अयोध्येला रवाना झाली. प्लॅटफार्म 1 वर भाजपकडून कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे आदी उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, सुमारे दीड हजार रामभक्तांना घेऊन आस्था निघाली आहे. आपण नशीबवान आहात, आम्हा नेतेमंडळींच्या पूर्वी तुम्हाला दर्शन मिळत आहे. आम्हाला पुण्य मिळावे म्हणून आम्ही येथे आलो आहोत. रामलल्लाने बोलाविल्याशिवाय आम्हाला जाता येणार नाही. दि. 22 जानेवारी हा इतिहासात सुवर्णाक्षरांनी दिवस लिहिला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नसते तर हा दिवस कधीच बघता आला नसता. या सरकारने न्यायालयाला योग्य पुरावे दिल्याने हा दिवस बघायला मिळाला. तुम्ही रामलल्लाचे दर्शन करण्यास चालला आहात, पर्यटनाला जात नाहीत, त्यामुळे शिस्त पाळण्याचे आवाहनही बावनकुळे यांनी प्रवाशांना केले. रेल्वे प्रशासन आणि आयआरसीटीसीकडून या वेळी सर्वतोपरी मदत करण्यात आली.

आमचा नमस्कार पोहचवा

आपल्या सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले पाहिजे. संघर्ष अनेकांनी केला, पण त्यांनी अतिशय शिताफीने प्रश्न सोडविला. तुम्ही सर्व भाग्यवान आहात. सर्वसामान्य माणसाचे दर्शन झाल्याशिवाय मंत्र्यांना दर्शन मिळणार नाही. मी तुम्हाला नमस्कार करतो. आमचा नमस्कार श्री रामापर्यंत पोहचवा. येताना प्रसाद घेऊन या, अशी भावनिक साद रामभक्तांना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घातली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news