वेल्हे : पुणे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या राजगड तालुक्यातील निगडे खुर्द येथील नागरिकांच्या मूलभूत समस्या अद्यापही ’जैसे थे’ आहेत. या गावाला स्मशानभूमीचीच प्रतीक्षा आहे. येथील एका महिलेचे निधन झाले. त्यांच्यावर भरपावसात अंत्यसंस्कार करावे लागले. पावसामुळे अग्नी विझू नये म्हणून नागरिकांना त्यावर ताडपत्री घेऊन थांबण्याची वेळ आली.
तोरणागडाच्या दक्षिणेकडे असलेल्या अठरागाव मावळ परिसरातील राजगड तालुक्याचे शेवटचे गाव म्हणजे निगडे खुर्द. या गावातील नागरिकांना स्मशानभूमी नसल्याने मृतांवर अंत्यसंस्कार करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे येथे मरणानंतरही नागरिकांचे हाल सुरू असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
येथील मृत सावित्रीबाई श्रीपती शिंदे यांच्यावर शुक्रवारी (दि. 22) अंत्यविधी करताना जोरदार पाऊस सुरू होता. या वेळी ग्रामस्थांना जळणारा मृतदेह विझू नये म्हणून त्यावर ताडपत्री धरावी लागली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गेल्या महिनाभरात गोविंद सखाराम शिंदे, माजी सैनिक गोविंद रामचंद्र जाधव व शुक्रवारी सावित्रीबाई श्रीपती शिंदे असे तीन मृत्यू झाले असून, भरपावसामध्ये अंत्यविधी करावा लागत आहे. जळताना मृतदेह विझू नये म्हणून त्यावर ताडपत्री पकडून नागरिकांना थांबावे लागले. गेल्या अनेक वर्षांपासून आमदारापासून ते जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांपर्यंत वारंवार मागणी करूनही स्मशानभूमी मिळत नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.
निगडे खुर्द गावामध्ये स्मशानभूमीसाठी अनेक वर्षांपासूनची मागणी असून, त्यासाठी अनेकवेळा पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही निधी मिळाला नाही.
- अश्विनी भावळेकर सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत, केळद