पुणे : ढोल-ताशा पथकांच्या वादनाचा गजर, बँड पथकाचे बहारदार वादन अन् ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष, अशा पुण्याच्या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीची वैभवशाली परंपरा बुधवारी (दि. 27) श्री गणेश चतुर्थीला पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहे. (Latest Pune News)
लाडक्या बाप्पाचे बुधवारी (दि. 27) आगमन होणार असून, गणरायाच्या आगमनासाठी गणेशभक्त अन् मंडळांचे कार्यकर्ते सज्ज आहेत. जल्लोषपूर्ण वातावरणात बाप्पाचे आगमन होणार आहे. श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांच्या श्री गणरायाच्या मूर्तींची मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. फुलांनी सजविलेल्या आणि विद्युतरोषणाईने उजळलेल्या उत्सव मंडपांत बाप्पा विराजमान होणार आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आल्याने भाविकांसह मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उद्यापासून (दि. 27) गणेशोत्सवाला सुरुवात होत असून, बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष सगळीकडे पाहायला मिळत आहे. यंदाही उत्सवाच्या पहिल्या दिवशी मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांची मिरवणूक अनुभवायला मिळणार आहे. त्यासाठीची तयारीही पूर्ण झाली आहे. सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांच्या गणपतीच्या मूर्तींची उत्साहपूर्ण वातावरणात प्राणप्रतिष्ठा होईल.
प्राणप्रतिष्ठेची वेळ - सकाळी 11 वाजून 37 मिनिटे; हस्ते : स्वामी सविनानंद
श्री कसबा गणपतीची आगमन मिरवणुकीची सुरुवात सकाळी 8 वाजता उत्सवमंडपातून होणार आहे. रास्ता पेठ येथे मूर्तिकार अभिजित धोंडफळे यांच्याकडून घेतलेली गणेशमूर्ती पारंपरिक चांदीच्या पालखीत विराजमान करण्यात येईल. रास्ता पेठ पॉवर हाऊस, दारूवाला पूल, देवाजी बाबा चौक, फडके हौद या मार्गाने मिरवणूक उत्सवमंडपाकडे मार्गक्रमण करेल. प्रभात बँड पथक, संघर्ष ढोल पथक, श्रीराम पथक आणि अभेद्य वाद्य पथकाचे बहारदार वादन पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहे. मिरवणूक उत्सवमंडपात आल्यानंतर गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.
प्राणप्रतिष्ठेची वेळ - दुपारी 12 वाजून 11 मिनिटे; हस्ते - शरदशास्त्री जोशी, प्रधान विश्वस्त, महायोग शक्तिपीठ, वासुदेव निवास आश्रम, पुणे
गणरायाची आगमनाची मिरवणूक सकाळी दहा वाजता नारायण पेठेतील केळकर रस्त्यावरील मंदार लॉज येथून निघेल व कुंटे चौक, नगरकर तालीम चौक, अप्पा बळवंत चौकमार्गे मिरवणूक उत्सवमंडपात पोहचेल. गणरायाची मूर्ती चांदीच्या पालखीत विराजमान असेल. आढाव बंधूंचे नगारावादन, न्यू गंधर्व ब—ास बँड, शिवमुद्रा ढोल-ताशा पथक, ताल पथक, विष्णुनाद शंख पथकाचे वादन होईल. सनई-चौघड्याच्या सुरावटीत गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
प्राणप्रतिष्ठेची वेळ - दुपारी 2 वाजून 35 मिनिटे; हस्ते - युवा उद्योजक पुनीत बालन
गणरायाची आगमन मिरवणूक सकाळी 11 वाजता गुरुजी तालीम गणपती मंदिर, गणपती चौक, लिंबराज महाराज चौक, अप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी चौक, गणपती चौक, गुरुजी तालीम गणपती चौक उत्सवमंडपमार्गे निघणार आहे. स्वप्निल सरपाले व सुभाष सरपाले यांनी बनविलेल्या फुलांच्या आकर्षक रथातून गणरायाची मिरवणूक निघणार आहे. मिरवणुकीत जयंत नगरकर यांचे नगारावादन, अश्वराज ब—ास बँड, गुरुजी प्रतिष्ठान ढोल-ताशा पथक, राघमंत्र ढोल-ताशा पथक, विघ्नहर्ता ढोल-ताशा पथक सहभागी होणार आहेत.
प्राणप्रतिष्ठेची वेळ - दुपारी 12 वाजून 15 मिनिटे; हस्ते - योगी निरंजननाथ महाराज, प्रमुख विश्वस्त, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज मंदिर, आळंदी.
मंडळ यंदाच्या वर्षी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. पालखीतून सकाळी पूजेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठेच्या मिरवणुकीला सकाळी दहा वाजता सुरुवात होणार आहे. लोणकर बंधू यांचे नगारावादन, रुद्रांग आणि तालगर्जना या पथकांचे वादन मिरवणुकीत होईल. मिरवणूक गणपती चौक लक्ष्मी रस्त्याने नगरकर तालीम चौकातून अप्पा बळवंत चौक, बुधवार पेठ चौक, बेलबाग चौक, लक्ष्मी रस्त्याने गणपती चौकातून तुळशीबागेत उत्सवमंडपापर्यंत काढण्यात येणार आहे.
प्राणप्रतिष्ठेची वेळ - सकाळी 10 वाजता
हस्ते - रौनक रोहित टिळक
मिरवणुकीला सकाळी 9 वाजता रमणबाग चौकातून सुरुवात होणार आहे. परंपरेनुसार मानाच्या पालखीत बाप्पा विराजमान असतील. 11 वाजता गणरायाची महाआरती होईल. या वेळी केसरी गणेशोत्सवाचे प्रमुख डॉ. रोहित टिळक उपस्थित असतील. त्यानंतर श्रीराम आणि शिवमुद्रा या ढोल-ताशा पथकांचे टिळकवाड्यात स्थिर वादन होईल तसेच बिडवे बंधू यांचे सनई-चौघडावादनही होणार आहे.
प्राणप्रतिष्ठेची वेळ - दुपारी 12 वाजता;
हस्ते - नवीनचंद्र विप्रदास मेनकर आणि स्नेहल नवीनचंद्र मेनकर
फुलांनी सजलेल्या मयूररथातून अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गजाननाची आगमन मिरवणूक सकाळी 10 वाजता निघणार आहे. अखिल मंडई मंडळ, मंडई पोलिस चौकी, बाबू गेनू चौक, रामेश्वर चौक, गोटीराम भैय्या चौक येथून उत्सवमंडपमार्गे मिरवणूक निघणार आहे. मिरवणुकीच्या अग्रभागी न्यू गंधर्व बँड पथक तसेच मल्हार ढोल-ताशा पथक, स्वराज्य पथक, समर्थ पथक वादन करतील. यंदाच्या गणेशोत्सवात ’कृष्णकुंज’ ही आकर्षक सजावट साकारण्यात येणार आहे. यावर्षी हलत्या झोपाळ्यावर शारदा-गजानन विराजमान होणार आहेत.
प्राणप्रतिष्ठेची वेळ - दुपारी 11 वाजून 11 मिनिटे; हस्ते - मध्य प्रदेश चित्रकुट येथील स्वामी घनश्यामाचार्य महाराज
प्राणप्रतिष्ठेपूर्वी सकाळी 8.30 वाजता मुख्य मंदिरापासून फुलांनी सजविलेल्या आकर्षक रथातून गणरायाची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. आकर्षक फुलांची सजावट आणि रथावर भगवान पद्मनाभ स्वामींची निद्रिस्त मूर्ती लावण्यात येणार आहे. मुख्य मंदिर, अप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, लोकमान्य टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सवमंडपात मिरवणूक येणार आहे. देवळणकर बंधूचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बँड, प्रभात बँड, मयूर बँड आणि गंधाक्ष ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग असणार आहे.