

महर्षीनगर: मार्केटयार्ड परिसरात भरपावसात भिंतींना चुना मारून सुशोभीकरणाचे काम करण्यात आले. मात्र, पावसामुळे हे रंगकाम वाहून गेल्याने या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या कामाची कोणतीही माहिती कार्यालयाला नसल्याचे बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त शीतल वडके यांनी स्पष्ट केले.
मुकुंदनगर-सॅलिसबरी पार्क प्रभागामधील (क्र. २१) एका खासगी सोसायटीच्या सुरक्षा भिंतीवर सुशोभीकरणाचे काम भरपावसात सुरू होते. पावसामुळे रंगकाम वाहून गेल्यानंतर स्थानिक नागरिकांनी चौकशी केली असता, महापालिकेला या कामाची माहिती नसल्याचे समोर आले. त्यामुळे नागरिकांच्या कररूपी पैशांचा अपव्यय झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
दरम्यान, संबंधित कामाची निविदा मंजूर नसतानाही काम सुरू झाल्याने महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. भरत जैन म्हणाले, 'हा महापालिका प्रशासनातील सावळा गोंधळ असून, पुणेकरांच्या पैशांचा अपव्यय आहे. निविदा मंजूर नसताना काम सुरू करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे.'
बाळासाहेब रुणवाल म्हणाले, 'शहर आणि उपनगरांमध्ये अनेक मूलभूत नागरी समस्या प्रलंबित आहेत. त्या सोडविण्याऐवजी महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सुशोभीकरणाच्या नावाखाली निधी खर्च करत आहेत. काळाची गरज ओळखून अनावश्यक खर्चावर अंकुश आणला पाहिजे.'
मूलभूत प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष!
प्रभाग क्रमांक २१ मध्ये विविध ठिकाणी भिंतींच्या रंगरंगोटी व सुशोभीकरणावर भर दिला जात आहे. मात्र, झोपडपट्ट्यांतील ड्रेनेज व्यवस्था, पाणीटंचाई, रस्त्यांवरील खड्डे, कचरा आदी मूलभूत प्रश्नांकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांची तक्रार आहे.
नागरिकांच्या मागणीनुसार प्रभागात सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत. मात्र, या कामाला अद्याप प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेली नाही. मंजुरीपूर्वी ठेकेदाराने काम कसे सुरू केले, याची माहिती नाही.
मनीषा चोरबेले, नगरसेविका