राजगडावर विकासकामे युद्धपातळीवर; जागतिक वारसास्थळाच्या मानांकनासाठी डागडुजी

राजगडावर विकासकामे युद्धपातळीवर; जागतिक वारसास्थळाच्या मानांकनासाठी डागडुजी

[author title="दत्तात्रय नलावडे " image="http://"][/author]

वेल्हे : जगातील सर्वोत्कृष्ट डोंगरी किल्ला म्हणून लौकिक असलेल्या किल्ले राजगडाची जागतिक वारसास्थळ मानांकनासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू असून, सध्या गडाच्या बालेकिल्ल्याच्या पायर्‍यांच्या डागडुजीची व इतर कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय मानांकन समिती किल्ल्याची पाहणी करणार आहे. पुरातत्व खात्याने या पाहणीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. गडाच्या डागडुजीसह ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन, आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. या कामासाठी 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

पुरातत्व विभागाचे पुणे विभागाचे सहसंचालक डॉ. विलास वाहणे म्हणाले, पावसाळ्यापूर्वी बालेकिल्ल्याच्या पायर्‍यांच्या डागडुजीची कामे पूर्ण होतील, त्यानंतर पाल खुर्द मार्गाच्या पायर्‍यांच्या डागडुजीचे काम करण्यात येणार आहे. गडावर ऐतिहासिक वास्तुस्थळे व इतिहासाची माहिती देणारे फलक लावण्यात येणार आहेत. हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या किल्ले राजगड जागतिक वारसास्थळ म्हणून जगभरात पोहचणार आहे. छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांनी 1647 मध्ये तोरणागड जिंकून स्वतंत्र राष्ट्राची, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यानंतर दुसर्‍या वर्षी 1648 मध्ये तोरणागडाच्या पूर्वेस असलेल्या मुरुंबदेवाच्या डोंगरावर प्रतिकूल परिस्थितीत किल्ला बांधून त्यास 'राजगड' असे नाव दिले.

शिवरायांनी स्वतःच्या कल्पकतेने राजगडाच्या किल्ल्याचे बांधकाम केले. जगातील सर्वात अभेद व बळकट डोंगरी किल्ला म्हणून राजगडाची ख्याती आहे. कवी परमानंद यांनी शिवभारत (अणुपुराण) मध्ये, तसेच छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांनी आपल्या ग्रंथात राजगडाच्या अभेद्य बळकटीचे वर्णन केले आहे. राजगड व किल्ल्याच्या परिसरात छत्रपती श्रीशिवाजी महाराज व त्यांना तोलामोलाची साथ देणार्‍या वीर मावळ्यांच्या शौर्याचा जिवंत वारसा आहे. राष्ट्रीय अस्मिता असलेल्या राजगड किल्ल्याचा जागतिक वारसास्थळ म्हणून जगभरात लौकिक पोहोचण्यासाठी पुरातत्व विभागाने आवश्यक कामांना प्राधान्य दिले आहे. सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. अशा रणरणत्या उन्हात तोरणा-राजगड परिसरातील मावळे, कारागिरांसह बाहेरचे मजूर काम करत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news