कोरेगाव पार्क, मुंढव्यातील पबवर हातोडा; महापालिकेची कारवाई | पुढारी

कोरेगाव पार्क, मुंढव्यातील पबवर हातोडा; महापालिकेची कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातामध्ये दोघांचा जीव गेल्यानंतर जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने बेकायदेशीर रुफटॉप आणि साइड मार्जिनमधील रेस्टॉरंट, बार, पबविरोधात मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईत बहुचर्चित वॉटर्स, कार्निव्हल, ओरिला, अनविल्ड, सुपर क्लब या हॉटेल व पबसह फ्रंट मार्जिन व साइड मार्जिनमधील 44 छोटे हॉटेल, 7 रुफटॉप हॉटेलचा समावेश आहे. कल्याणीनगर येथील बॉल आर पबसमोर रविवारी मध्यरात्री बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाच्या कारने दुचाकीला धडक दिल्याने एका तरुणाचा व एका तरुणीचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील पब आणि रुफटॉप हॉटेलचा विषय पुन्हा ऐरणीवर आला.

या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या बांधकाम विभागाने संबंधित हॉटेल (रेस्टॉरंट) आणि पबच्या बांधकामाचे सर्वेक्षण सुरू केले. ज्या ठिकाणी मंजूर नकाशापेक्षा अनधिकृत बांधकाम केले गेले अशा ठिकाणी कारवाई केली जात असून, मुंढवा-घोरपडी, कल्याणीनगर आदी भागांतील चाळीस ठिकाणी अनधिकृत शेड उभ्या केल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. बांधकाम विभागाने बुधवारी मुंढवा, कोरेगाव पार्क, पुणे स्टेशन, कल्याणीनगर, विमाननगर, घोरपडी या भागांमध्ये हॉटेल, रेस्टॉरंटवर कारवाई केली. मुंढवा भागामध्ये नदीलगत असलेले मोठे हॉटेल्स, हॉटेल अनवाईड, हॉटेल सुपरक्लब, ओरीला या नव्याने चालू असलेल्या हॉटेलमधील अनधिकृत बांधकाम जॉकटरच्या माध्यमातून पूर्ण पाडण्यात आले. यामधील काही हॉटेलचा वापर पब म्हणून केला जात होता.

फ्रंट मार्जिन व साइड मार्जिनमधील 44 छोटे हॉटेल, 7 रुफटॉप हॉटेलवर कारवाई केली. 54 हजार 300 चौरस फुटांचे बांधकाम पाडण्यात आले. या कारवाईमध्ये 10 अभियंता, 21 पोलिस, 45 एमएसएल, 40 मजूर, जॉकटर 1, जेसीबी 7, ब्रेकर 3, गॅसकटर 3 यांचा समावेश होता, अशी माहिती मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली. महापालिकेने पबवर आणि टेरेसवरील हॉटेलवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

मिळकतकर विभागही ‘अ‍ॅक्टिव्ह’

मोठ्या संख्येने पब, रेस्टॉरंट, हॉटेल असलेल्या कल्याणीनगर, खराडी, मुंढवा-घोरपडी, कोरेगाव पार्क आदी भागांत जागेच्या वापरातील बदल, बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेले शेड आदीकडे मिळकतकर विभागाने लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार विशेष पथक नियुक्त करून या भागातील बांधकामाचे सर्वेक्षण केले जाईल. जागेच्या वापरातील बदल, बेकायदेशीर शेड आदींवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे मिळकतकर विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button