वेल्हे: चार वर्षांपूर्वी दुरुस्त केलेल्या बंधाऱ्याची पुन्हा दुरुस्ती केल्याचे कागदोपत्री दाखवून लाखो रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार राजगड तालुक्यातील केळद येथील भोर्डी-पिशवी येथे उघडकीस आला आहे. याबाबत केळदचे माजी सरपंच रमेश शिंदे व शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे.
चार वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने भोर्डी-पिशवी येथील बंधाऱ्याची दुरुस्ती केली होती. त्या वेळी अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले. त्यानंतर 7 मार्च 2025 रोजी या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. (Latest Pune News)
6 सप्टेंबर रोजी काम पूर्ण केल्याचे कागदोपत्री दाखवून ठेकेदार व अधिकाऱ्यांनी तब्बल 19 लाख 86 हजार 280 रुपयांचा अपहार केला असे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. कोणत्याही प्रकारच्या दुरुस्तीचे काम न करता बंधाऱ्यावर लघु पाटबंधारे विभागाने दुरुस्तीचा फलक लावला. त्यानंतर हा प्रकार स्थानिक शेतकऱ्यांनी उघडकीस आणला.
याबाबत केळदचे माजी सरपंच रमेश शिंदे म्हणाले, लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने निकृष्ट दर्जाचे बंधारे बांधले जात आहेत. पावसाळा संपताच थेंबभरही पाणी साठत नाही. भोर्डी पिशवी येथील बंधाऱ्याची बोगस दुरुस्ती करून संगनमताने ठेकेदार व अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांचा अपहार केला आहे.
प्रत्यक्षात बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे चार वर्षांपूर्वी सुरू असलेली गळती सुरू आहे. काही ठिकाणी वरवर सिमेंट लावले आहे. मात्र, पाया व भिंतीतून धो-धो पाणी वाहत आहे. पाणी अडवण्यासाठी बंधाऱ्याचे गेट बसविण्यात आलेले नाहीत.
याबाबत लघु पाटबंधारे विभागाचे राजगड विभागाचे उपविभागीय अभियंता ओंकार शेरेकर म्हणाले, निविदेनुसार ठेकेदाराने या बंधाऱ्याची दुरुस्ती केली आहे. काही त्रुटी असतील तर त्याची पाहणी केली जाईल. 15 ऑक्टोबर नंतर गेट बसवून बंधाऱ्यात पाणी अडविले जाणार आहे.