सुषमा नेहरकर-शिंदे
राजगुरुनगर: चाकण-आळंदी रस्त्यावर तब्बल 25 हेक्टरमध्ये पसरलेल्या वन विभागाच्या उद्यानाला ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा लाभला आहे. या परिसरात रोटाई मातेचे मंदिर असून, येथे पांडवकालीन जलकुंडदेखील आहे. परंतु वाढत्या औद्योगीकरणाचा फार मोठा फटका सध्या या उद्यानाला बसत असून, हा संपूर्ण परिसर सध्या कचराकुंडी झाला आहे.
या ठिकाणी सर्रास ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टर घरगुती व अन्य हानीकारक कचरा टाकला जात असून, संपूर्ण परिसर प्रचंड दुर्गंधीयुक्त झाला आहे. रोटाई तलाव परीसरात प्रादेशिक वनविभाग जुन्नरच्या वतीने ज्ञानराई वन उद्यान प्रकल्प जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन समितीला सादर केला असून दोन वर्षांपासून तो कागदावरच राहिला आहे. (Latest Pune News)
सध्या खेड तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गांसह चाकण एमआयडीसी आणि लगतच्या परिसरात जिथे रिकामी जागा दिसेल तेथे सर्वत्र कचराच कचरा दिसत आहे. यामध्ये चाकण-आळंदी रस्त्यावर वन विभागाची तब्बल 25 हेक्टर जमीन पडून आहे. हे राखीव उद्यान असून, फार मोठी वृक्ष नसली तरी लहान झाडा-झुडपांनी व गवताने हा परिसर व्यापला आहे.
याच परिसरात पुरातन रोटाई मातेचे मंदिर व पांडवकालीन जलकुंड देखील आहे. अशा प्रकारे ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा लाभलेली आळंदी व देहू तीर्थक्षेत्राच्या हाक्केच्या अंतरावर असलेली ही जागा लगतच असलेल्या परिसरातील लोक, ग्रामपंचायती व औद्योगिक वसाहतीवाल्यांसाठी मोफत कचरा टाकण्याची हक्काची जागा झाली आहे. चाकण मार्गे आळंदीला जाताना या परिसरातून प्रवास करताना नाकाला रुमाल लावल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही ऐवढी प्रचंड दुर्गंधी येते.
...असा आहे प्रकल्प
महाराष्ट्राचे राज्य फुल असलेल्या ताम्हण या वृक्षाचा आकार डोळ्यासमोर ठेवून ज्ञानराई वन उद्यानाची संकल्पना मांडण्यात आली आहे. त्यामध्ये गवतापासून तयार केलेली उद्याने, रॉक गार्डन, वृद्धांसाठी नाना-नानी पार्क, तरुणांसाठी फिटनेस पार्क, चिल्ड्रन पार्क, नेचर ट्रेल्स, पक्षी निरीक्षण, फुलपाखरू उद्यान, योग केंद्र इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. या उद्यानाचे नावीन्यपूर्ण पद्धतीने आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.
उदा. 360 डिग्री, सुरक्षेसाठी आतल्या उद्यानाभोवती उंच सरंक्षक टॉवर, सुरक्षा कॅमेरे, वायरलेस कम्युनिकेशन सिस्टम आणि अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली स्थापन केली जाईल. ऐतिहासिक पांडव तलावाचे सुशोभीकरण करून त्याच्या सभोवती वॉकिंग ट्रॅक तसेच निसर्गाच्या अनेक पैलूंची ओळख करून देण्यासाठी देहू आणि आळंदीच्या प्रतिकृती तयार करून पर्यटक व भाविकांना पुरेशी माहिती उपलब्ध करून देण्यात येईल.