

मंचर: सोनावळे (ता. जुन्नर) येथील आदिवासी आश्रमशाळेत काही शिक्षकांचा मनमानी कारभार सुरू असून, मुलांकडे शिक्षक लक्ष देत नाहीत. या शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी सोनावळे येथील ग्रामस्थांनी केली असून, याबाबत त्यांनी घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील सहायक प्रकल्प अधिकारी संदीप पाटील यांच्याकडे अर्ज केला आहे. पुढील 15 दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे.
सरपंच सुखदेव रावते, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संतोष रावते, सुरेश रावते आणि ग्रामस्थ यांनी याबाबत सांगितले की, सोनावळे येथे आदिवासी प्रकल्पांतर्गत आश्रमशाळा असून, या आश्रमशाळेचा शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा 2017-18 पासून कमी होत चालला आहे. पूर्वी या शाळेत 400 ते 500 विद्यार्थी होते. (Latest Pune News)
सद्यस्थितीत ही संख्या 180 ते 200 आहे. शाळेच्या भोवताली संरक्षण भिंत बांधावी, यासाठी 2022 पासून कागदोपत्री पाठपुरावा केला जात आहे. वारंवार घोडेगाव येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयात अर्जदेखील केले आहेत; मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
या शाळेतील काही शिक्षक चांगले आहेत; मात्र काही शिक्षक हे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करत मनमानी पद्धतीने कारभार करत आहेत. अशा शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.
त्यामुळे या शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रकल्पाधिकारी प्रदीप देसाई हे चांगल्या प्रकारे काम करत होते; मात्र त्यांच्यावर खोटे आरोप करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बरोबर नसल्याचे त्यांनी सांगितले.
दोन वर्षांपूर्वी शालेय व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये शिक्षकांना शालेय गुणवत्तेबाबत तसेच दुपारच्या वेळी महिला शिक्षकांचे वस्तीगृहात काय काम असते याबाबत विचारले असता त्या वेळी देखील मुख्याध्यापकांनी शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांवर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. यासह घोडेगावचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्यावरदेखील चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल झाला.
- सुखदेव रावते, संतोष रावते आणि सुरेश रावते, सरपंच, माजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ सोनावळे